काल Nvidia (एनव्हिडिया) या GPUs तयार करणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याच्या आघाडीच्या कंपनीने आता चक्क मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलला मागे टाकत जगातली सर्वाधिक भागभांडवल (मार्केट कॅपिटल) असलेली कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे! सर्वत्र वाढत चाललेल्या AI च्या वापरामुळे Nvidia च्या GPUs आणि AI चिप्सची मागणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
यामुळेच गेल्या काही महिन्यात या कंपनीच्या शेयर्सची सतत वाढ होत आहे! अवघ्या पाच वर्षात यांचा शेयर तब्बल ३५०० टक्क्यांनी वाढला आहे! काही दिवसांपूर्वीच आम्ही त्यांनी ॲपलला मागे टाकत दुसरं स्थान मिळवल्याची माहिती दिली होती आणि आता थेट मायक्रोसॉफ्टलासुद्धा मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे!
आता AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या सेवा मोठ्या प्रमाणात वाढल्या असून त्यामुळेच मायक्रोसॉफ्ट, मेटा, गूगल, ॲमेझॉन, Oracle, Tesla सारख्या सर्व आघाडीच्या कंपन्या Nvidia च्या AI Chips वापरतात! यामुळेच ही कंपनी दिवसेंदिवस अधिकच मोठी होत चालली आहे.
आता या कंपनीने ३ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे! आम्ही फेब्रुवारीमध्ये याबद्दल लेख प्रकाशित केला होता त्यावेळी कंपनीने गूगलच्या अल्फाबेटला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची कंपनी बनण्याचा मान मिळवला होता आणि त्यांचं त्यावेळी १.८ ट्रिलियन डॉलर्स भागभांडवल होतं !
काल Nvidia ने मायक्रोसॉफ्ट आणि ॲपलला मागे टाकल्यावर या कंपनीचं मार्केट कॅपिटल आता 2,78,00,560 कोटी रुपये (डॉलर्समध्ये 3.335 Trillion USD) इतकं झालं आहे!
अर्थात या यादीतील काही नावे सारखीच वरखाली झालेली दिसत राहतील पण Nvidia ने AI च्या वाढीमुळे घेतलेली झेप नक्कीच कौतुकास्पद आहे!