कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) हा इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातला सर्वात मोठा कार्यक्रम ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान पार पडला! सीईएस कार्यक्रम लास वेगासमध्ये भरला असून नेहमीप्रमाणे सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये आपापली उत्पादने सादर करण्यासाठी जोरात स्पर्धा दिसून आली…यावेळी अपेक्षेप्रमाणे सर्व गोष्टीत AI जोडण्यास सुरुवात झाली आहे असं दिसून आलं. हा बराच मोठा कार्यक्रम असल्याने यामधील प्रत्येक गोष्टीबाबत सांगता येणार नाही मात्र काही प्रमुख चर्चा झालेली उपकरणांची माहिती खाली देत आहोत.
LG (एलजी) : एलजी खऱ्या अर्थाने CES 2024 गाजवलं असं म्हणता येईल. त्यांनी LG Signature OLED T नावाचा पारदर्शक डिस्प्ले असलेला टीव्ही सादर केला आहे. होय या टीव्हीमध्ये टीव्ही सुरू असतानाच काचे प्रमाणे टीव्हीच्या मागेसुद्धा पाहता येतं! हा ७७ इंची OLED टीव्ही असून हा नॉर्मल टीव्हीप्रमाणेसुद्धा वापरता येतो. या टीव्हीला यंदाच्या कार्यक्रमात Best Of CES 2024 असल्याचा मान मिळाला आहे! यासोबत UltraGear OLED मॉनिटर्स, एक कन्सेप्ट कार ज्यामध्ये LG Mobolity अंतर्गत त्यांच्या कार्समध्ये जोडता येणाऱ्या सोयी दाखवल्या आहेत. LG Dukebox हे ३० इंची पारदर्शक डिस्प्ले असलेलं गाणी ऐकण्यासाठी उपकरण आणि CineBeam Qube नावाचा छोटा प्रॉजेक्टरसुद्धा त्यांनी इथे सादर केला आहे!
व्हिडिओ : https://youtu.be/2BZy3OJeAbs
Samsung (सॅमसंग) : सॅमसंगनेसुद्धा Transparent डिस्प्लेचं तंत्रज्ञान सादर केलं आहे. यासोबत त्यांचे Neo QLED टीव्ही, Flex Fip नावाचा दुमडता येणारा कन्सेप्ट फोन. Rollable OLED डिस्प्ले, Ballie नावाचा AI robot आणि Samsung Music Frame नावाचं स्पीकर उपकरण सादर केलं आहे. यावेळी त्यांनी AI for All या घोषवाक्याखाली त्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांची स्मार्ट होम उपकरणे आणि आता लवकरच येणार Galaxy S24 सिरिज स्मार्टफोनमध्येही Galaxy AI चा समावेश असेल.
Sony (सोनी) : गेल्यावर्षी सादर झालेल्या Afeela कन्सेप्ट कारमधील नव्या सोयी यावेळी सोनीने प्रदर्शित केल्या असून यासाठी त्यांनी चक्क Playstation 5 चा कंट्रोलर वापरुन ही कार स्टेजवर चालवून दाखवली! या कारमध्ये तब्बल ४५ कॅमेरा आणि सेन्सर आहेत! शिवाय या कारमध्येच PS5 गेम्स खेळता येतात. प्रत्यक्ष उपलब्ध होणाऱ्या कारमध्ये मात्र या सर्व सोयी कदाचित नसतील.
ही कार २०२५ मध्ये बुकिंग सुरू होऊन २०२६ मध्ये उपलब्ध होईल. यासोबत नवा XR हेडसेट, कंटेंट क्रिएटर्ससाठी आभासी स्टुडिओ आणि त्यासंबंधीत टुल्सबद्दल माहिती दिली.
व्हिडिओ : https://youtu.be/GtdWs8WkWds?t=1780
Rabbit : या कंपनीने Rabbit R1 नावाचं हे छोटं AI आधारित उपकरण आणलं असून त्यांच्या म्हणण्यानुसार हे उपकरण तुमच्या फोनची जागा घेऊ शकतं. यामध्ये पर्सनल असिस्टंट सारख्या सोयी असून आपण बोलून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणं, सांगितलेल्या वेळी कॅब मागवणं, हॉटेलचं बुकिंग करणं, गाणी वाजवणं अशा गोष्टी करू शकतं. याच्या लॉंचनंतर अनेकांनी असं मत व्यक्त केलं की हे सर्व आपण आपल्या फोनमध्येही करू शकतो. यावर त्यांचं उत्तर असं आहे की यामधील ओएस अत्यंत वेगाने या सर्व क्रिया करू शकते आणि फोनमधील AI apps ना या वेगात या क्रिया करणं शक्य नाही. यासाठी त्यांनी Large Action Model चा वापर केला असून याची किंमत 200 डॉलर्स असणार आहे. विशेष म्हणजे याचं बुकिंग सुरू झालं आहे आणि दोन दिवसात २०००० जणांनी यासाठी नोंदणी केली आहे!
व्हिडिओ https://youtu.be/vp52L6UlmJY
Volkswagen : कंपनीने त्यांच्या कारमध्ये पूर्वी असलेल्या व्हॉईस असिस्टंटला आता ChatGPT ची जोड देत असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे तुम्ही कार चालवत असतानाच कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारून माहिती घेऊ शकता!
Asus एसुस : एसुसने बरेच नवे लॅपटॉप्स जाहीर केले असून यामधील खास म्हणजे Zenbook Duo. या लॅपटॉपमध्ये दोन १४ इंची 3k रेजोल्यूशन आणि 16:10 aspect ratio असलेले oled डिस्प्ले आहेत! आणि विशेष म्हणजे आपल्याला हव्या त्या प्रकारे त्यांची मांडणी करता येते! याची किंमत $1499 पासून सुरू होते. याच कार्यक्रमात एसुसने त्यांच्या गेमिंग फोन मालिकेतील ASUS ROG Phone 8 आणि 8 Pro सादर केले आहेत.
Lenovo लेनेवो : या कंपनीने ThinkBook Plus Gen 5 Hybrid हा 2 in 1 लॅपटॉप आणला असून यामध्ये Windows 11 आणि Android या दोन्ही ओएस उपलब्ध आहेत.
Hyundai हयुंडाई : कंपनीने Supernal S-A2 या उडणाऱ्या इलेक्ट्रिक एयर टॅक्सीबद्दल माहिती दिली असून २०२८ पर्यंत ही प्रत्यक्षात उपलब्ध होईल.
DJI : DJI Flycart 30 हा एक वस्तु डिलिव्हरी करणार ड्रोन असून ३० किलो पर्यंतच्या जड वस्तू या ड्रोनमार्फत १६ किमी अंतरावर पाठवता येतात! सांगितलेल्या ठिकाणी गेल्यावर ड्रोनला जोडलेली वस्तू आपोआप खाली ठेऊन मग ड्रोनची दोरी detach होऊन परत ड्रोन मध्ये जाते आणि ड्रोन मूळ ठिकाणी परततो.
व्हिडिओ https://youtu.be/Hhp11I-vGHA