मायक्रोसॉफ्टने काल झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या बिंग (Bing) या सर्च इंजिनमध्ये ChatGPT ची जोड देऊन विचारलेल्या प्रश्नांची स्मार्ट आणि पूर्ण माहितीसह उत्तरे मिळतील अशी सोय दिली आहे! शिवाय त्यांच्या Edge ब्राऊजरमध्येही आता नव्या डिझाईनसह AI आधारित सुविधा देण्यात आल्या आहेत!
नवं मायक्रोसॉफ्ट बिंग वापरण्यासाठी लिंक : bing.com/new
मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नाडेला यांनी AI मूलभूतपणे सर्व सॉफ्टवेअर प्रकारात बदल घडवून आणेल आणि याची सुरुवात सर्वात मोठ्या अशा सर्च पासून होईल. यासाठीच आम्ही आज AI Copilot आणि चॅटची जोड देऊन बिंग आणि एज नव्याने सादर करत आहोत जेणेकरून लोक सर्च आणि वेबमधून अधिक माहिती मिळवू शकतील असं सांगितलं आहे. सध्या हे वापरण्यासाठी वरील लिंकवर जाऊन Waitlist जॉइन करावी लागते मात्र येत्या काही दिवसात सर्वांना ही सोय उपलब्ध होईल.
विशेष म्हणजे मायक्रोसॉफ्टने बिंगसाठी OpenAI चं आणखी मोठं आणि सुधारित लॅंगवेज मॉडेल वापरलं असून ChatGPT आणि GPT 3.5 यांचा वापर केला आहे ज्यामुळे अधिक अचूक उत्तरे आपल्याला मिळू शकतील. बिंगमधील AI ची उत्तर ChatGPT पेक्षा नवीन आणि अचूक असतील कारण याला वेबवरील माहिती वाचून त्यानुसार उत्तर देण्याची क्षमता दिलेली आहे. ChatGPT मध्ये २०२१ पर्यंतचीच माहीती उपलब्ध आणि त्यानुसारच तो उत्तरे देतो. यामुळेच ChatGPT पेक्षा मायक्रोसॉफ्ट बिंग वापरण्यास युजर्स प्राधान्य देऊ शकतील.
एज ब्राऊजरसाठी साइडबार मध्ये Chat and compose नावाने सुविधा दिली आहे. ज्याद्वारे आपण एखादी वेबसाइट ब्राऊज करत असतानाच बाजूला हा साइडबार उघडून त्या विषयी आणखी माहिती विचारून तिथेच त्याचं उत्तर पाहू शकता! Compose द्वारे तिथेच ईमेल, ट्विटस लिहून घेऊ शकता. आपण फक्त विषय, प्रकार निवडायचा आपल्याला ड्राफ्ट लिहून मिळेल!
मायक्रोसॉफ्टच्या बिंगची कामगिरी गूगलसमोर अगदीच कमी प्रमाणात आहे. आजवर त्यांना सक्षम पर्याय म्हणून कधीच पाहिलं गेलं नाही मात्र प्रथमच या ChatGPT सोबलं जोडलं गेल्यामुळे कदाचित बिंग नवी उभारी घेऊ शकेल. मायक्रोसॉफ्टने यासाठी OpenAI कंपनीमध्ये अनेक बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
कालच गूगलने कालच ChatGPT ला त्यांचं उत्तर म्हणून Google Bard नावाचा चॅटबॉट आणत असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यांनी सर्चमध्येही तो जोडणार असल्याचं सांगितलं होतं. मायक्रोसॉफ्टने लगेच त्यांचा कार्यक्रम घेऊन ही नवी घोषणा केली! यावरून AI द्वारे ग्राहक मिळवण्यासाठी सध्या या कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेची जाणीव होईल.