फूड डिलिव्हरीसाठी प्रसिद्ध असलेली झोमॅटो कंपनी आता ग्राहकांना इतर शहरांमधूनही पदार्थ मागवण्याचा पर्याय देत आहे. इतर शहरातील प्रसिद्ध हॉटेलमधील लोकप्रियपदार्थाची चव तुम्ही तुमच्या शहरात बसून घेऊ शकाल. सध्या या नव्या सोयीची गुरुग्राम आणि दिल्लीमध्ये या शहरांमध्ये चाचणी सुरू असून बेंगळुरू, लखनौ, हैदराबाद, जयपूर, कोलकाता आणि दिल्ली या शहरांमधून पदार्थ मागवण्याची सोय दिलेली आहे.
यासाठी नवा Intercity Legends नावाचा विभाग उपलब्ध करून देण्यात आला आहे. वेगवेगळ्या शहरांमधील पदार्थ विमानामार्फत पोहोचवण्यात येईल जेणेकरून एका दिवसात याची डिलिव्हरी शक्य होईल. उदा. कोलकत्त्यामधून रसगुल्ले, हैदराबादची बिर्याणी, लखनौचे कबाब, इ. उपलब्ध पदार्थांची चाचणी करण्यात आली असून त्यांची चव, सुवास सारखीच राहावी अशा प्रकारे हे पदार्थ डिलिव्हर केले जातील. यासाठी पुनर्वापर करता येईल असं पॅकेजिंग आणि खास मोबाइल रेफ्रीजरेशन तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे असं झोमॅटोचे प्रमुख दिपिंदर गोयल यांनी त्यांच्या ब्लॉग पोस्ट मध्ये सांगितलं आहे.
सध्या काही ठराविक शहरांमध्येच असलेली ही सोय मिळणाऱ्या प्रतिसादानुसार इतर शहरांमध्ये उपलब्ध केली जाईल.
तसे पाहता आपआपल्या शहरातच फूड डिलिव्हरीचे बऱ्याचदा वाईट अनुभव आपल्याला येतात. तुमच्या शहरात अशी सोय उपलब्ध झाली तर तुम्ही दुसऱ्या शहरातील पदार्थ ऑर्डर कराल का ? कमेंटमार्फत नक्की कळवा.