यूट्यूबने त्यांचा यूट्यूब पार्टनर प्रोग्रॅम आता मोठ्या व्हिडिओसोबत शॉर्ट्स तयार करणाऱ्या क्रिएटर्ससाठीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. यामुळे शॉर्ट्स म्हणजेच एक मिनिटापर्यंत लांबी असलेले उभे व्हिडिओ तयार करून पैसे कमावता येतील. Creator Music नावाच्या नव्या सोयीद्वारे यूट्यूबवर व्हिडिओसोबत लावण्यासाठी गाणी आणि संगीत उपलब्ध करून दिलं जाईल ज्यामुळ क्रिएटर आणि संगीतकार दोघांनाही उत्पन्न मिळेल!
सध्या यूट्यूबवर जर पैसे जाहिरातीमार्फत पैसे कमवायचे असतील तर त्यांच्या यूट्यूब पार्टनर प्रोग्रॅमचा (YPP) सदस्य असावं लागतं. त्याचं सदस्य बनण्यासाठी तुमच्या चॅनलवर १००० सबस्क्रायबर्स आणि गेल्या बारा महिन्यात तुमचे 4000+ Watch Hours (व्हिडिओ पाहिले गेल्याची एकूण वेळ) ४००० तासांपेक्षा अधिक असावी लागते. जे नवीन क्रिएटर्स अर्थातच खूप अवघड आहे.
अपडेट : १ फेब्रुवारी २०२३ पासून हा पर्याय (Shorts Monetization) उपलब्ध होणार आहे!
मात्र आता त्या ऐवजी जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ तयार करत असाल तर YPP सदस्य बनण्यासाठी तुमच्या चॅनलवर १००० सबस्क्रायबर्स आणि गेल्या तीन महिन्यात तुमच्या शॉर्ट व्हिडिओना एक कोटी व्ह्यूज पूर्ण झालेले असले पाहिजेत! तसं पाहायला गेलं तर हे सुद्धा खूप अवघड असणार आहे. पण किमान Watch Hours च्या ऐवजी आणखी एक पर्याय उपलब्ध झालेला आहे. हा पर्याय २०२३ च्या सुरुवातीपासून उपलब्ध होणार आहे. ज्यानंतर या प्रोग्रॅमचे सदस्य बनल्यावर तिथून पुढे तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी हिस्सा ४५% तुम्हाला आणि उर्वरित ५५ टक्के यूट्यूबकडे जाईल.
यासोबत आता Super Thanks, Super Chat, Super Stickers आणि चॅनल मेंबरशिप असे पर्यायसुद्धा तुम्हाला पैसे मिळवून देतील जे थेट तुमच्या व्हिडिओ पाहणाऱ्या viewers कडून आलेले असतील आणि त्याबदल्यात त्यांना खास स्टीकर्स, चॅनलचा खास वेगळा कंटेंट पाहायला मिळेल असा पर्याय आहे. याला YPP Fan Funding असं म्हटलं जाईल.
यूट्यूब व्हिडिओवर गाणी वापरण्यासाठी आता नवा Creator Music नावाचा पर्याय देण्यात येणार आहे. यामध्ये जास्त लांबीच्या व्हिडिओमध्ये वापरण्यासाठी गाणी विकत घेता येतील आणि मग हव्या तेवढया वेळा वापरता येतील जेणेकरून कॉपीराइट स्ट्राइकची भीती राहणार नाही.
ज्यांना संगीत विकत घ्यायचं नाही त्यांना त्या व्हिडिओमार्फत आलेल्या उत्पन्नामधून त्या संगीत तयार करणाऱ्या व्यक्ति/कंपनीसोबत त्यांचं उत्पन्न वाटून घ्यावं लागेल. याची सुरुवात अमेरिकेत २०२३ पासून करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी यूट्यूबचा ब्लॉग पहा : https://blog.youtube/news-and-events/supporting-the-next-wave-of-creative-entrepreneurs/
यूट्यूबने आता स्पष्टपणे टिकटॉक आणि इंस्टाग्रामच्या रील्सच्या स्पर्धेमुळेच शॉर्ट्स तयार करणाऱ्या क्रिएटर्सना प्रोत्साहन देऊन त्याचा वापर वाढावा या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. सर्वच प्लॅटफॉर्म आता शॉर्ट व्हिडिओकडे पळत असताना यामध्ये वाढत्या स्पर्धेमुळे व्हिडिओचा दर्जा मात्र ढासळत चालला आहे हे नक्की.