व्हॉट्सॲप या प्रसिद्ध मेसेजिंग ॲपमध्ये आज अनेक नव्या सोयी जोडण्यात येत असून याची माहिती व्हॉट्सॲपने जाहीर केली आहे. नव्या प्रायव्हसी फीचर्समुळे आणखी सुरक्षित व गोपनीय मेसेजेस करता येतील असं त्यांचं म्हणणं आहे.
नव्या सोयींमध्ये प्रामुख्याने इतरांच्या नकळत ग्रुप सोडता येणे, तुम्ही ऑनलाइन असलेलं कोणाला दिसेल याचं नियंत्रण आणि View Once प्रकारच्या मेसेजेसचा स्क्रीनशॉट काढता येणार नाही असा बदल करण्यात आला आहे.
इतरांच्या नकळत ग्रुप सोडणे : कधी कधी आपल्याला नको असलेल्या ग्रुप्समधून बाहेर पडणं अवघड व्हायचं कारण त्याची वेगळी नोटिफिकेशन सर्वांना दिसायची आणि त्यामुळे काही लोक दुखावले जायचे. त्याऐवजी आता सर्व सदस्यांऐवजी फक्त ग्रुप ॲडमिनलाच अमुक एका सदस्याने ग्रुप सोडला आहे हे दिसेल.
तुम्ही ऑनलाइन असल्याचं कोणाला दिसेल याचं नियंत्रण : कधी कधी काही ठराविक लोकांना आपण ऑनलाइन असल्याचं कळू न देता इतरांचे मेसेज पहायचे असतात. आता त्यासाठी स्वतंत्र पर्याय देण्यात आला आहे. या महिन्यात हा बदल दिसून येईल.
View Once प्रकारच्या मेसेजेसचा स्क्रीनशॉट काढता येणार नाही : View Once म्हणजेच एकदा पाहिले की डिलिट होणारे मेसेजेसचा आता स्क्रीन शॉट काढता येणार नाही असा बदल करून देण्यात आला आहे. याची चाचणी सुरू असून लवकरच सर्व युजर्ससाठी हा बदल करण्यात येईल.
हे अपडेट आलं तरीही समोरची व्यक्ती तुमच्या मेसेजचा दुसऱ्या फोनद्वारे फोटो काढून ठेऊ शकते आणि त्यावर नियंत्रण ठेवणं शक्य नाहीच.