यूट्यूब पाहण्यासाठी बऱ्याच अँड्रॉइड फोन यूजर्सनी YouTube Vanced चा पर्याय निवडला होता. यूट्यूबच्या अधिकृत ॲपमध्ये पैसे द्याव्या लागणाऱ्या सुविधा या ॲपमध्ये मोफत दिल्या जात होत्या. उदा. जाहिरातींशिवाय सर्व व्हिडिओ पाहणे, व्हिडिओ डाउनलोड करणे, बॅकग्राउंडमध्ये व्हिडिओ प्ले करणे असे पर्याय यामध्ये होते. मात्र हे सर्व नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याने गूगलने सरतेशेवटी यावर कारवाईचं पत्र (cease and desist letter) पाठवून आता हे ॲप बंद करायला लावलं आहे.
यूट्यूबवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जाहिराती त्रासदायक ठरत आहेत. यामुळे व्हिडिओ दरम्यान बराच व्यत्यय येतो. त्या व्हिडिओचा म्हणावासा आनंद घेता येत नाही. काहीवेळा संगीत ऐकताना संबंध नसलेल्या जाहिराती रसभंग करतात. यामुळेच युजर्स ॲडब्लॉक, Vanced सारखे पर्याय वापरणं सुरू करतात. याला काही प्रमाणात यूट्यूब स्वतःसुद्धा नक्कीच जबाबदार आहे.
यूट्यूबची स्वतःची यूट्यूब प्रीमियम नावाची पेड सेवा आहे ज्यामध्ये जाहिराती दिसत नाहीत, व्हिडिओ बॅकग्राउंड प्ले करता येतो, यूट्यूब म्युझिक मोफत मिळतं, व्हिडिओ डाउनलोड करता येतात. मात्र यासाठी महिन्याला जवळपास १२९ रुपये मोजावे लागतात. अनेकांना तेव्हढे पैसे मोजायचे नव्हते त्यामुळे ते YouTube Vanced या पर्यायाकडे वळले. अर्थात हे Vanced ॲप मुळातच बेकायदेशीर होतं त्यामुळं आज ना उद्या ते बंद होणारच होतं. कारण जाहिराती हाच यूट्यूबच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. अशा प्रकारे त्यांच्या उत्पन्नावर परिणाम करणारे पर्याय बंदच होणार आहेत. आता Vanced ला यूट्यूब आणि संबंधित सर्व लिंक्स काढून टाकण्यास सांगण्यात आलं आहे.विशेष म्हणजे ज्यांच्याकडे सध्या हे ॲप इंस्टॉल केलेलं आहे त्यांच्याकडे हे आणखी काही महीने तरी चालत राहू शकेल असं Vanced तयार करणाऱ्यांनी सांगितलं आहे!
आता हा पर्याय बंद होतोय तर याची जागा उद्या दुसरे अनेक पर्याय घेतील. पण याबद्दल आमची सूचना अशीच राहील की अशा प्रकारे कोणतेही ॲप्स इंटरनेटवरुन डाउनलोड करून इंस्टॉल करायला जाऊ नका. यामुळे तुमच्या फोनमध्ये मॅलवेयर शिरण्याचा मोठा धोका आहे. ज्यामर्फत तुमच्या फोनमधील डेटा चोरला जाऊ शकतो. शिवाय हे ॲप्स गूगल प्ले स्टोअरवर अधिकृतरित्या उपलब्ध नसल्याने त्यांच्या बाबतीत सुरक्षा आणि प्रायव्हसी यांची कसलीच खात्री ठेवता येत नाही.
हे असे ॲप्स वापरण्यापेक्षा यूट्यूब प्रीमियमचं सभासदत्व घेऊ शकता. यामुळे तुमच्या आवडीचा कंटेंट तयार करणाऱ्यांनासुद्धा मदत होईल आणि तुम्हालाही जाहिरातीशिवाय व्हिडिओ पाहता येतील. शिवाय यूट्यूब प्रीमियम सभासदांना खास वेगळा कंटेंट सुद्धा पाहायला मिळतो. अनेक सुविधासुद्धा मिळतात.
मध्यंतरी Thop TV नावाचं ॲपसुद्धा असंच मोफत लाईव्ह टीव्ही चॅनल्स उपलब्ध करून द्यायचं त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. भारतात चित्रपट, गाणी, व्हिडिओ यांच्यासाठी पैसे मोजणं ही संकल्पनाच बऱ्याच लोकांना नकोशी वाटते. सर्वकाही टेलिग्रामसारख्या माध्यमावर मोफत सहज उपलब्ध होतं. असं केल्यानं आपल्यासाठी जे लोक त्यांचा संपूर्ण वेळ तो कंटेंट तयार करण्यासाठी घालवतात त्यांना त्याचा काहीच मोबदला मिळत नाही. कित्येक जणांच्या नोकऱ्या त्यावर अवलंबून असतात. पुढे त्यांची सेवा, चॅनल चालवणं कसं शक्य होईल हा साधा विचार सुद्धा केला जात नाही. अशी पायरसीला पायबंद घालणारी पावले उचलल्यास हे प्रमाण थोडं तरी कमी नक्कीच होईल…शिवाय अशा सेवा देणाऱ्यानीसुद्धा ग्राहकांवर जाहिरातींचा अतिरेक होणार नाही आणि त्यांना कंटेंट सहज पाहता येईल याकडे लक्ष द्यायला हवं.
YouTube Vanced APK to shut down due to Google’s cease and desist letter to developers