गूगल क्रोम या जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ब्राऊजरची शंभरावी आवृत्ती आजपासून उपलब्ध होत असून गूगलच्या या ब्राऊजरने अल्पावधीत गाठलेलं अव्वल स्थान अजूनही टिकवून ठेवलं आहे. या आवृत्तीमध्ये या निमित्ताने काही विशेष फीचर जोडण्यात आलेलं नाही मात्र त्यांचा नवा लोगो आता आणखी नव्या उपकरणांवर उपलब्ध झाला आहे.
गूगल क्रोम प्रथम सप्टेंबर २००८ मध्ये Beta आवृत्तीमध्ये सादर करण्यात आलं होतं. आता तब्बल १३.५ वर्षांनी याची १०० वी आवृत्ती आली आहे आणि त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स अशा सर्वांना मागे टाकत गेली कित्येक वर्षं हा ब्राऊजर प्रथम स्थानी विराजमान आहे! सोपा सहज इंटरफेस, वेगवान पेज लोडिंग, सुरक्षित असा हा पर्याय लगेचच लोकप्रिय झाला होता.
गूगल क्रोमचा हा नवा लोगो तब्बल ८ वर्षांनी बदलण्यात आला आहे. याबद्दल फेब्रुवारी मध्ये माहिती देण्यात आली होती. नव्या लोगोला आता आणखी फ्लॅट डिझाईनमध्ये रूपांतरित करण्यात आलं असून हा लोगो प्रत्येक ओएसवर त्या त्या ओएसला साजेशा स्वरूपात दिसेल. उदा. मॅकवर देण्यात आलेलं थोडंसं 3D डिझाईन!
अँड्रॉइडवर Chrome 100 मध्ये आणखी ठिकाणी त्यांचं नवं Material You डिझाईन पाहायला मिळेल.
हे अपडेट मिळवण्यासाठी तुमच्या ब्राऊजरमध्ये जाऊन उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्स > Help > About Google Chrome वर जा आणि क्रोम अपडेट होऊ लागेल. फोनवर अपडेट करण्यासाठी प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरमधून अपडेट करा. “chrome://whats-new/” या URL वर गेल्यास नव्या क्रोममधील सोयी दिसतील.
गूगल क्रोम डेव्हलपर्सनी या निमित्ताने #100CoolWebMoments या हॅशटॅग अंतर्गत developer.chrome.com/100/ या वेबसाइटवर गूगल क्रोमचा आजपर्यंतचा प्रवास मांडला आहे! सोबत या काळात संबंधित क्षेत्रात घडलेल्या विशेष गोष्टीसुद्धा येथे दिसतील!
मराठीटेकवरचा पहिला लेखसुद्धा गूगल क्रोमबद्दलच होता! 🙂