शेयरचॅट या सोशल मीडिया ॲप कंपनीने Times Internet ची मालकी असलेल्या MX Takatak या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मला विकत घेतलं असून हा व्यवहार 600 मिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ४४९६ कोटी रुपयात पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. याविषयी अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
यामुळे शेयरचॅटच्या Moj या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मला आणखी बळ मिळणार असून सध्या मोजचे १६ कोटी दरमहा ॲक्टिव यूजर्स आहेत तर टकाटकचे १५ कोटी. आता दोन्हीचे मिळून ३१ कोटीहून अधिक दरमहा यूजर्स शेयरचॅटकडे असतील. त्यांचे प्रतिस्पर्धी जोश (Josh) चे ११.५ कोटी दरमहा ॲक्टिव यूजर्स आहेत. जोशची मालकी डेलीहंटकडे आहे.
इंस्टाग्रामवरील Reels लोकप्रिय असल्या तरी शॉर्ट व्हिडिओच्या क्षेत्रात टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये मोज, टकाटक आणि जोशचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यांच्या यूजर्समध्ये गेल्या दोन वर्षात मोठी वाढ दिसून आली आहे. यासाठी टिकटॉक भारतात बॅन होणं मोठं कारण म्हणता येईल.
MX टकाटकची सुद्धा सुरुवात टिकटॉक बॅननंतर लगेच झाली होती. यांनी त्यांचा लोगोसुद्धा टिकटॉकसारखाच ठेवला होता शिवाय ॲपचं डिझाईनसुद्धा तसंच आहे! त्यानंतरही सध्या उपलब्ध असणाऱ्या बऱ्याच ॲप्सचं नाव टिकटॉकशी साधर्म्य साधणारं आहे.
गेल्यावर्षीच शेयरचॅट कंपनी 14905 कोटींहून अधिक व्हॅल्यूएशन मिळवून यूनिकॉर्न स्टार्टअप्समध्ये पोहोचली होती.
शेयरचॅट कंपनीची सुरुवात अंकुश सचदेव, फरीद अहसान आणि भानू सिंग या आयआयटीच्या तीन विद्यार्थ्यानी मिळून केली होती. भारतीय भाषांमधील कंटेंटसाठी भारतातल्या ॲप्समध्ये शेयरचॅट अजूनही सर्वात मोठा प्लॅटफॉर्म म्हणता येईल.