फेसबुक या गेली अनेक वर्षं सर्वात लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया वेबसाइटचे यूजर्स त्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच कमी झाले आहेत. यासोबत कंपनीची कामगिरीसुद्धा गेल्या चौमाहीत अपेक्षेपेक्षा कमी राहिली. यामुळेच मेटा कंपनीचे शेयर्स तब्बल २० टक्क्यानी पडले आहेत!
अर्थात ही कमी झालेली संख्या अल्प प्रमाणात असली तरी आजवर असं कधीच झालं नव्हतं. फेसबुकच्या सुरुवातीपासूनच त्यांचे यूजर्स नेहमी वाढतच गेले होते. मात्र गेल्या चार महिन्यात आधीच्या तुलनेत त्यांच्या दैनंदिन ॲक्टिव्ह यूजर्स कमी झाले आहेत.
मेटा कंपनीने या खालवलेल्या कामगिरीसाठी टिकटॉककडून वाढलेली स्पर्धा, ॲपलचा प्रायव्हसीबाबतचे बदल यांना दोष दिला आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि ऑक्युलस या कंपन्यांची मालकी असलेल्या मेटाने काल त्यांचा Earning Report जाहीर केला असून त्यामध्ये ही माहिती मिळाली आहे.
गेल्या काही महिन्यात अनेक वेळा वादात सापडलेल्या फेसबुकचा वापर बराच कमी झाला आहे. सर्वच वयोगटातील यूजर्स आता त्यांच्याच इंस्टाग्रामकडे वळत आहेत. प्रायव्हसीच्या बाबतीत तर फेसबुकची पूर्णपणे बदनामी झालेली आहे. खोट्या माहिती पसरवणाऱ्या पोस्ट्स, पूर्णपणे जाहिरातींमध्ये व्यापून जाणाऱ्या टाइमलाइन, राजकीय पोस्ट्स, नव्याने आलेले इतर कमी त्रासदायक पर्याय यांमुळे फेसबुक सोडून इतर सोशल मीडिया अधिक प्रसिद्ध होऊ लागला आहे.
इंस्टाग्राम जरी त्यांचंच असलं तरीही फेसबुकचा कमी होणारा वापरसुद्धा त्यांना परवडणारा नाही कारण या प्लॅटफॉर्मवरील जाहिरातींमधून त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग येत असतो.
तुमच्या आसपास सुद्धा थोड्या प्रमाणात का होईना मित्र मैत्रिणींचं फेसबुकचा वापर कमी झालेला जाणवलं असेलच…तुमचा याबद्दल अनुभव काय आहे ते नक्की कॉमेंटद्वारे व्यक्त करा…