भारताच्या अर्थ मंत्रालयातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार चीनी स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमीला ६५३ कोटींची कस्टम ड्युटी (सीमाशुल्क) बुडवल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. भारतात रजिस्टर करण्यात आलेल्या शाओमी इंडियाने मूल्यमापन कमी दाखवून सीमा शुल्क चुकवलं असल्याची माहिती ५ जानेवारीला Directorate of Revenue Intelligence (DRI) ने जाहीर केली आहे.
काही दिवसांपूर्वीच शाओमी आणि ओप्पोच्या भारतातल्या कार्यालयामध्ये शोधमोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये अशी माहिती मिळाली आहे की शायोमी Qualcomm USA आणि Beijing Xiaomi Mobile Software यांना रॉयल्टी आणि लायसन्स फी देत आहे. मात्र यांची Transactional Value म्हणजे किंमत शाओमी इंडिया वस्तु इम्पोर्ट करताना जोडत नसल्याचं समोर आलं आहे. याचा कालावधी एप्रिल २०१७ ते जून २०२० दरम्यान येतो.याची किंमत ६५३ कोटी होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या तपासात पुढे असे दिसून आले की, शाओमी इंडिया ही कंपनी MI या ब्रॅंड नावाने मोबाइल फोन्सची विक्री करते आणि हे मोबाइल फोन शाओमीद्वारे आयात केले जातात किंवा शाओमी इंडियाशी करारबद्ध असलेल्या उत्पादकांद्वारे मोबाइल फोनचे सुटे भाग आणि घटक आयात करून भारतात मोबाईल फोनची जोडणी केली जाते. करारानुसार, करारबद्ध असलेल्या उत्पादकांनी उत्पादित केलेल्या MI ब्रँडच्या मोबाइल फोनची विक्री केवळ शाओमी इंडिया कंपनीलाच केली जाते.
शाओमीने यावर प्रतिक्रिया देताना “आम्ही सर्व भारतीय कायद्यांचं पालन होईल याला सर्वाधिक महत्व देतो. आम्ही नोटीसीचा अभ्यास करत असून एक जबाबदार कंपनी म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांना लागेल ती सर्व कागदपत्रे पुरवण्यात सहकार्य करू” असं म्हणलं आहे.