जपानची प्रसिद्ध कंपनी सोनीने आज CES 2022 येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या कंपनीतर्फे इलेक्ट्रिक कार आणणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी त्यांनी Sony Mobility Inc या नव्या कंपनीचीही घोषणा केली आहे. या कंपनीचं या वर्षी मार्चनंतर अधिकृत लॉंच करण्यात येईल.
सोनी सध्या इतर कंपन्यांसोबत भागीदारी करून त्यांना इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्मार्ट सुविधा विकसित करून देत आहे ज्यांचा समावेश इतर कार्समध्ये केला जाईल. यासाठीच त्यांनी Vision S 01 ही सिडान कार आणि काल जाहीर करण्यात आलेली Vision S 02 ही SUV प्रोटोटाइप म्हणजे चाचणीसाठी उपलब्ध करून दिली आहे. ज्याद्वारे प्रत्यक्ष खरेदी करता येईल अशी कार आणण्यात आली नसली तरी त्यांच्या पार्टनर कंपन्यामधील स्मार्ट सोयी कशा प्रकारे काम करतील हे त्यांनी सांगितलं आहे.
Safety, Adaptability आणि Entertainment या तीन गोष्टींवर या कार्समधील सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अर्थात या कन्सेप्ट कार्स असणार आहेत ज्या आहे ह्या स्वरूपात आपल्याला लगेच पाहायला मिळणार नाहीत. फक्त एक कल्पना येण्यासाठी या कार्स डिझाईन केलेल्या आहेत.
मात्र या कन्सेप्ट कार्स सोबत त्यांनी स्वतःसुद्धा या क्षेत्रात प्रवेश करत स्वतःच्या कार्ससुद्धा बाजारात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगत नव्या सोनी मोबिलिटी कंपनीबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन वर्षात सोनीच्या कार्स आपल्याला नक्कीच रस्त्यावर धावताना पाहायला मिळू शकतात. सध्या अनेक कंपन्या या इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात येण्यासाठी प्रयत्न करत असून सोनीची विश्वासार्हता त्यांना नक्कीच मोठा ग्राहकवर्ग मिळवून देऊ शकते.