ॲपल आज जगातली पहिली ३ ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅपिटल असलेली कंपनी बनली आहे. रुपयांमध्ये सांगायचं तर तब्बल ~ २२२ लाख कोटी रुपये भागभांडवल! ॲपलची यावेळी मायक्रोसॉफ्टसोबत स्पर्धा होती! मात्र शेवटी ॲपलने पुन्हा एकदा बाजी मारत हा बहुमान पटकावला आहे!
ऑगस्ट २०१८ मध्ये पहिली १ ट्रिलियन डॉलर्स मार्केट कॅपिटल असलेली कंपनी बनली होती. त्यानंतर दोन वर्षांनी २ ट्रिलियन डॉलर्स आणि आता जानेवारी २०२२ मध्ये 3 ट्रिलियन डॉलर्स भागभांडवल असलेली कंपनी बनली आहे! अर्थात मार्केट स्थितीनुसार त्या शेयरचीही किंमत काही वेळातच खाली आली आणि त्यांचं सध्याचं मार्केट कॅप 2.9 ट्रिलियन डॉलर्सवर आहे.
९ जानेवारीला ॲपलच्या स्टीव्ह जॉब्स यांनी आयफोनचं अनावरण करून १५ वर्षे पूर्ण होणार आहेत.
मोठ्या प्रमाणात विक्री होणाऱ्या आयफोन्स, मॅकबुक्स, आयमॅक, वॉच, आयपॅड अशा उपकरणांसोबत ॲपल टीव्ही, ॲपल म्युझिक अशा सेवांमुळे त्यांचं उत्पन्न अनेक पटींनी वाढलं आहे! चीन या जगातल्या सर्वात मोठ्या स्मार्टफोन मार्केटमध्येही ॲपल पहिल्या स्थानी आहे. ॲपलला एकूण उत्पन्नापैकी जवळपास ५२ टक्के उत्पन्न केवळ आयफोन्सच्या विक्रीमधून प्राप्त होत आहे!
अनेकांनी यावर ॲपल उपकरणे पुसण्याचं कापड आणून त्याची किंमत फक्त १,९०० रुपये ठेवून त्यांचं हे कॅपिटल मोठं करत आहे अशा आशयाने त्यांच्या उपकरणांच्या वाढलेल्या किंमतीवर भाष्य केलं आहे! येत्या काळात ॲपल स्वतःची इलेक्ट्रिक कारसुद्धा सादर करणार असल्याची चर्चा नेहमी सुरू असते. शिवाय लवकरच VR हेडसेटसुद्धा आणणार असल्याची शक्यता आहे.
जगात सर्वात जास्त मार्केट कॅप असलेल्या कंपन्या
- ॲपल : 2.9 ट्रिलियन डॉलर्स
- मायक्रोसॉफ्ट : 2.5 ट्रिलियन डॉलर्स
- अल्फाबेट (गूगल) : 1.9 ट्रिलियन डॉलर्स
- ॲमेझॉन : 1.6 ट्रिलियन डॉलर्स
- टेस्ला : 1 ट्रिलियन डॉलर्स
स्थापनेनंतर ४२ वर्षात ॲपलने १ ट्रिलियनचा टप्पा गाठला होता आणि त्यानंतर ४ वर्षात हा नवा टप्पा गाठला असून याआधी तब्बल ११७ वर्षांपूर्वी १९०१ मध्ये यूएस स्टीलने 1 बिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला होता. पेट्रो चायनानेसुद्धा एका दिवसासाठी 1 ट्रिलियनचा टप्पा ओलांडला होता. तसेच जर आधीच्या ऑइल कंपन्यांचे सध्याच्या चलनामध्ये रूपांतर केल्यास या जुन्या कंपन्या कित्येक पटीने पुढे असतील मात्र या कंपन्या आता शक्यतो विभाजित झालेल्या आहेत.
ॲपलची मार्केटमधील सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी लिंक : Apple (AAPL) Current Share Stats
search terms : Apple first company to cross $3 trillion market cap US nasdaq