नेटफ्लिक्स या प्रसिद्ध स्ट्रीमिंग सेवेने भारतात त्यांचे नवे प्लॅन्स जाहीर केले असून आधीच्या तुलनेत त्यांची किंमत बरीच कमी झाली आहे. स्वस्त प्लॅन्समुळे अधिकाधिक लोक नेटफ्लिक्स वापरू शकतील. आता प्लॅन्स १४९ रुपयांपासून सुरू होत असून सर्व डिव्हाईसवर वापरता येईल असा बेसिक प्लॅन १९९ रुपयांपासून सुरू होत आहे!
त्यांचा सर्वात महाग प्रीमियम प्लॅन जो UHD कंटेंट उपलब्ध करून देतो तो आता ६४९ दरमहा या किंमतीत उपलब्ध होईल. यामध्ये एकावेळी चार उपकरणांवर कंटेंट पाहता येतो.
तुम्ही सध्या नेटफ्लिक्सचे सभासद असाल तर तुम्हाला आपोआप पुढील प्लॅन्सवर अपग्रेड केलं जाईल. उदा. तुम्ही जर सध्या ४९९ च्या प्लॅन्सवर असाल तर तुम्हाला त्याच किंमतीत पण अधिक पर्याय असलेल्या प्लॅनवर नेण्यात येईल. तुम्हाला जर खालच्या प्लॅनवर जायचं असेल तर तसा पर्याय निवडावा लागेल आणि मग पुढील बिलिंग सायकलमध्ये तो लागू होईल.
नेटफ्लिक्सने २०१६ मध्ये भारतात प्रवेश केला असून अजूनही त्यांना फारसा ग्राहकवर्ग मिळवता आलेला नाही. याचं मुख्य कारण हेच की इतर स्ट्रीमिंग सेवांच्या तुलनेत ह्यांची जास्त किंमत. नेटफ्लिक्सच्या एका महिन्याच्या किंमतीत इतर स्ट्रीमिंग सेवा जवळपास वर्षभर सेवा देत आहेत. कालच आलेल्या माहितीनुसार नेटफ्लिक्सकडे भारतातील OTT प्लॅटफॉर्ममध्ये फक्त ५% हिस्सा आहे. लगेचच आज ही दर कमी करत असल्याची बातमी आली आहे.
नेटफ्लिक्सने यावर्षी ४१ नवे टायटल्स (चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरी, इ.) आणत असल्याचं जाहीर केलं होतं.
नेटफ्लिक्सने नवे प्लॅन्स जाहीर करण्यासाठी स्वतंत्र व्हिडिओसुद्धा त्यांच्या सोशल मीडियाद्वारे प्रसारित केला आहे!