विंडोज १० असलेल्या पीसीवर मायक्रोसॉफ्टची नवी ऑपरेटिंग सिस्टम Windows 11 मोफत अपडेट द्वारे उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. २४ जूनला मायक्रोसॉफ्टने खास कार्यक्रमात विंडोज ११ ची घोषणा केली होती.
२०१५ मध्ये विंडोज १० सादर केल्यानंतर आज तब्बल ६ वर्षांनी विंडोज ११ च्या रूपात नवी ऑपरेटिंग सिस्टम आणण्यात आली आहे. विंडोज ११ आता अधिक वेगवान, अधिक सोयींसोबत नव्या डिझाईनसह उपलब्ध होत आहे.
तुम्हाला जर अपडेटची वाट पाहायची नसेल तर तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवरून ISO डाउनलोड करून आत्ताच विंडोज ११ इंस्टॉल करू शकता. खालील लिंकवर जाऊन उपलब्ध तीन पर्यायांपैकी गरजेनुसार डाउनलोड करू शकता. जुन्या लॅपटॉप/पीसीवर TPM ची requirement सेट केल्यामुळे अनेकांना विंडोज ११ अपडेट सध्यातरी इंस्टॉल करता येणार नाही. त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी करून BIOS मध्ये बदल करून घ्यावे लागतील.
तुमचा लॅपटॉप/पीसी विंडोज ११ करता येईल का हे पाहण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एक PC Health Check टुल उपलब्ध करून दिलेलं आहे, यामध्ये तुम्हाला जर इंस्टॉल करता येईल असं दिसलं तरच इंस्टॉल करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा उगाच वेळ जाऊ शकतो. शिवाय विंडोज ११ इंस्टॉल करण्याची घाई करू नका असा सल्ला आम्ही देऊ इच्छितो कारण नवीन ऑपरेटिंग सिस्टम मध्ये अजूनही सर्व गोष्टी व्यवस्थित चालत नसतात त्यामुळे काही काळ गेल्यावरच इंस्टॉल करा.
Download Windows 11 ISO : https://www.microsoft.com/en-us/software-download/windows11
नवं डिझाईन, नवं स्टार्ट बटन, वॉलपेपर, आयकॉन्स, विंडोसाठी गोलाकार कोपरे, रंगसंगतीचे बरेच पर्याय, विंडो मॅनेज करण्यासाठी नवे पर्याय, नवं ॲक्शन सेंटर, नवं मायक्रोसॉफ्ट स्टोअर, विजेट्स, इ बऱ्याच गोष्टी पाहायला मिळत आहेत. यामध्ये स्टार्ट मेन्यू जरी मध्यभागी दिसला असला तरी तो नेहमीप्रमाणे डावीकडेसुद्धा ठेवता येतो.
यासोबत नव्या विंडोजमध्ये असलेल्या स्टोअरवर चक्क अँड्रॉइड ॲप्ससुद्धा इंस्टॉल करता येणार आहेत! मायक्रोसॉफ्टने यासाठी ॲमेझॉन ॲप स्टोअरची मदत घेतली आहे आणि इंटेलचं तंत्रज्ञान जोडून तुम्हाला विंडोज पीसीवरच अँड्रॉइड ॲप्ससुद्धा वापरता येतील! मात्र लॉंच होताना सध्या हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. येत्या काही दिवसात अपडेटद्वारे हा पर्याय पहायला मिळेल.
विंडोज ११ अपडेट करण्यासाठी असलेल्या प्रक्रियेबद्दल मायक्रोसॉफ्टचा लेख : Getting ready for the Windows 11 upgrade