फेसबुक संस्थापक मार्क झकरबर्गने काल झालेल्या फेसबुक कनेक्ट कार्यक्रमात त्यांच्या नव्या कंपनीचं नाव जाहीर केलं असून Meta या नावाखाली त्यांच्या सर्व सेवा व ॲप्स उपलब्ध होतील. फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, ऑक्युलस यांची नावे बदलण्यात येणार नसून त्याऐवजी या सर्व सेवा मेटा या कंपनी अंतर्गत आणल्या जातील. या सर्व सेवा व इतर येणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून Metaverse उभं करण्याचा मार्कचा मानस आहे!
या रिब्रंडिंग नंतर गूगलच्या सेवा ज्याप्रमाणे अल्फाबेट या कंपनी अंतर्गत समाविष्ट करण्यात आल्या तशाच प्रकारे फेसबुकच्या सेवा Meta मध्ये समाविष्ट केल्या जात आहेत. Metaverse म्हणजे पुढील सोशल कनेक्शन मधील क्रांती असेल असं फेसबुकचं म्हणणं आहे. हा प्रोजेक्ट जगभरातील लोकांकडून तयार केला जाईल आणि तो सर्वांसाठी खुला असेल. आजपर्यंत कधीही शक्य झालं नव्हतं अशा प्रकारे आपण शिकणार, गेम्स खेळणार व काम करणार असंही त्यांचं म्हणणं आहे!
Oculus या त्यांचा व्हर्च्युअल रिॲलिटी साठी असलेल्या कंपनीची उत्पादने आता Meta नावाने ओळखली जातील उदा. Oculus Quest चं नाव आता Meta Quest असं केलं जाईल. यामुळे तर नक्कीच म्हणता येईल की या नव्या कंपनीचा फोकस VR वरच जास्त असेल. आज झालेल्या कार्यक्रमातसुद्धा metaverse ची माहिती देताना एकंदरीत VR आधारित भविष्य कसं असेल याचीच माहिती देण्यात आली होती.
VR आधारित भविष्य पाहून त्यावर अधिक काम करण्याकडे लक्ष देणार असल्याचं यावरून दिसून येत आहे. सध्या अनेक मुद्यांवरून कंपनी वादात सापडली असताना हे असं नाव बदलून आणखी काय वेगळं होईल असाही प्रश्न अनेकांनी विचारला आहे. जवळपास सर्व प्रमुख टेक कंपन्यांपैकी फेसबुकचीच सध्या सर्वात वाईट इमेज बनली आहे. त्यादृष्टीने मेटामधून काही चांगले बदल घडवण्यात येतील का ते पाहायचं…