यापूर्वी तुम्ही ऑडिओ, व्हिडिओ, चित्रपट, वेब सिरीज स्ट्रीम करत पाहिल्या असतील. अलीकडेच स्टेडिया, xCloud सारख्या सेवांद्वारे गेमिंगसुद्धा स्ट्रीमिंगमार्फत उपलब्ध झालं आहे. आता चक्क विंडोज ओएसच थेट क्लाऊडमार्फत कोणत्याही उपकरणावर वापरता येईल! याद्वारे विंडोज १० किंवा विंडोज ११ थेट कोणत्याही उपकरणाच्या वेब ब्राऊजरमध्ये स्ट्रीम करत वापरता येईल! मायक्रोसॉफ्ट या विंडोजला हायब्रिड विंडोज असंही म्हणत आहे.
अनेक वर्षं आपण रीमोट डेस्कटॉप अॅक्सेस किंवा virtualization मार्फत एखादा पीसी दुसऱ्या उपकरणावर (उदा. लॅपटॉप, टॅब्लेट किंवा मोबाइल फोनवरसुद्धा) पाहू शकायचो. मात्र आता थेट विंडोज ओएसच क्लाऊडवर उपलब्ध होत आहे. यासाठीच्या सेवेचं नाव Windows 365 असं असणार आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या क्लाऊड सेवांसाठी Microsoft Office 365 उपलब्ध आहे त्याच धर्तीवर आता विंडोज ३६५ ओएस वापरता येईल! यामुळे तुम्ही तुमच्याकडे असलेलं उपकरण चांगल्या क्षमतेच हार्डवेअर नसलेलं असेल तरीही Windows 365 ची नोंदणी घेऊन इंटरनेटद्वारे ब्राऊजरमार्फत चांगल्या पीसीचा वापर करू शकता.
Windows 365 केवळ व्यावसायिक/बिझनेस ग्राहकांसाठीच उपलब्ध होणार आहे. २ ऑगस्ट पासून सबस्क्रिप्शन मार्फत ही सेवा मिळेल. याची किंमत अजून जाहीर करण्यात आलेली नाही. यामध्ये बिझनेस आणि एंटरप्राइज असे दोन प्रकार असतील. दोन्हीमध्ये मायक्रोसॉफ्टचीच अझुर (Azure Virtual Desktop) सेवा वापरलेली असेल. यामधील पीसीमध्ये एक सिपीयू+ 2GB रॅम+ 64GB स्टोरेज पासून आठ सिपीयू + 32GB रॅम + 512GB स्टोरेज पर्यंत असे एकूण १२ configurations उपलब्ध आहेत.
खर पाहायचं तर अशा प्रकारची सुविधा देणारेमायक्रोसॉफ्टचेच बरेच पर्याय आधीपासून उपलब्ध आहेत पण मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार आधीचे पर्याय आजवर तांत्रिक कारणांमुळे वापरता आले नाहीत किंवा ते खूपच महाग व वापरण्यास अवघड असे होते. अशा ग्राहकांसाठी हा नवा पर्याय उपयोगी पडेल. नवी Windows 365 सेवा अवघ्या काही मिनिटात सेटप करून वापरण्यास सुरुवात करता येईल!