गेले काही महिने अनेक कंपन्या ग्राहकांना अधिकाधिक वेगाने चार्ज होणारे स्मार्टफोन्स आणत आहेत. यामध्ये चीनी फोन कंपन्यांनी सध्या मोठी आघाडी घेतली असून काल शायोमीने हायपर चार्ज नावाचं असं तंत्रज्ञान आणलं आहे ज्याने फोन केवळ ८ मिनिटात १००% चार्ज होऊ शकतो!
सध्या बऱ्याच फोन्समध्ये 15W/25W/30W/45W/50W/65W/120W पर्यंतचं चार्जिंग सपोर्ट पाहायला मिळतो. मात्र शायोमीने थेट 200W पॉवर सप्लाय घेणारं तंत्रज्ञान त्यांच्या फोन्समध्ये जोडलं आहे. शिवाय हेच वायरलेस प्रकारे म्हणजे वायरशिवाय करण्यासाठी चक्क 120W फास्ट चार्जिंगसुद्धा यांनी विकसित केलं आहे! वायरलेस चार्जिंगद्वारे हा फोन १५ मिनिटात फुल चार्ज होतो.
याला त्यांनी Xiaomi HyperCharge असं नाव दिलं आहे.
शायोमीच्या खास तयार केलेल्या Mi 11 Pro मध्ये ही चाचणी करण्यात आली ज्यानुसार 4000mAh ची बॅटरी चार्ज होण्यास फक्त ८ मिनिटे कालावधी लागतो तर याच फोनची बॅटरी ५०% चार्ज होण्यासाठी केवळ ३ मिनिटे लागतात!
यापूर्वीचा रेकॉर्ड ओप्पो आणि रियलमीचा 125W चार्जिंग साठी होता ज्यामध्ये 4000mAh बॅटरी असलेला फोन चार्ज होण्यासाठी २० मिनिटे लागतात.