काही वेळापूर्वी पार पडलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) कंपनी प्रमुख मुकेश अंबानी यांनी JioPhone Next हा फोन आणत असल्याचं जाहीर केलं असून हा भारतातलाच नव्हे तर जगातला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन असेल असं त्यांनी सांगितलं आहे. हा फोन गूगलसोबत भागीदारी करून तयार करण्यात आला आहे असंही सांगण्यात आलं आहे.
हे जाहीर करत असताना गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून गूगल आणि जिओ यांच्या भागीदारी मार्फत करण्यात येत असलेले प्रयत्न त्यांनी सांगितले
जिओफोन नेक्स्ट मध्ये स्मार्टफोन्स मध्ये असणाऱ्या सर्व सुविधा मिळतील. जिओचे सर्व स्मार्ट Apps यामध्ये उपलब्ध असतील. शिवाय याचं सॉफ्टवेअर गूगलने तयार केलेलं असेल. सध्यातरी यामधील हार्डवेअरची फार माहिती देण्यात आली नाही.
गूगलची Android Go ऑपरेटिंग सिस्टम यामध्ये जोडलेली असेल शिवाय गूगलचं खास गूगल कॅमेरा App सुद्धा यामध्ये पाहायला मिळेल. Google Assistant, Camera Go, Google Go, Language Translation, Smart Camera with AR Filters अशा सुविधा यामध्ये आहेत. हा फोन ब्लॅक आणि ब्ल्यु रंगात मिळेल.
या फोनची किंमत यावेळी जाहीर करण्यात आली नाही मात्र हा फोन १० सप्टेंबर म्हणजे यावर्षीच्या गणेश चतुर्थीनिमित्त खरेदीसाठी उपलब्ध होईल.
अजूनही 2G फोन्स वापरत असलेल्या यूजर्सना 4G च्या नव्या जगात आणण्यासाठी गूगल आणि जिओचा हा प्रयत्न आहे असं दोन्ही कंपन्यांनी सांगितलं आहे.
Jio 5G बाबतही त्यांनी यावेळी काही माहिती दिली असून त्यांच्या चाचणीमध्ये 1Gbps पर्यंत स्पीड मिळाला आहे. Jio 5G मध्ये गूगलच्या क्लाऊड सेवांचा वापर केलेला असेल. जिओ फायबरच्या ग्राहकांमध्येही मोठी वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.