वनप्लस कंपनीचे सीईओ पीट लाऊ यांनी काल जाहिर केलेल्या माहितीनुसार OnePlus आता अधिकृतरित्या ओप्पो कंपनीमध्ये विलीन होत आहे. यापुढे त्यांचे फोन्स ओप्पोसोबत एकत्र येऊन तयार केले जातील.
खरतर बरेच महिने वनप्लसचे फोन्स ओप्पोच्याच फॅक्टरीमध्ये बनवले जात आहेत. शिवाय ओप्पो, विवो, रियलमी, वनप्लस, आयक्यू या सर्वच कंपन्याची मालकी BBK Electronics या कंपनीकडे आहे! आता यापुढे वनप्लस ओप्पोचा ब्रॅंड म्हणून काम करेल. तरीही दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने काम करत राहतील.
यामुळे आमच्या ग्राहकांना लवकर अपडेट्स देणं शक्य होईल आणि अधिक चांगली उत्पादने आणता येतील असं सांगण्यात येत आहे. “आमच्या यूजर्स आणि कम्युनिटीमध्ये यामुळे सकारात्मक बदल होईल असा मला विश्वास आहे. या ओप्पोसोबतच्या भागीदारीने आमच्याकडे आता अधिक संसाधने असतील ज्यामुळे तुमच्यासाठी अधिक उत्तम उत्पादने आणू शकू.” असं पीट लाऊ म्हणाले आहेत.
वनप्लस ब्रॅंडची ओळख एक स्वस्त किंमतीत उत्तम सॉफ्टवेअर आणि चांगलं हार्डवेअर देणारी अशा प्रकारे होती पण गेल्या काही वर्षात त्यांची ओळख पुसत चालली आहे. चीनी कंपनी असली तरी सॉफ्टवेअरमुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. OxygenOS मुळे त्यांना अँड्रॉइड फोन्समधील सर्वोत्तम सॉफ्टवेअर असलेले फोन्स म्हंटल जाऊ लागलं होतं. भारतात तर प्रीमियम फोन्स विभागात यांनी पहिलं स्थानसुद्धा मिळवलं होतं. मात्र आता बऱ्याच गोष्टी बदललेल्या दिसत आहेत.
शिवाय त्यांचे दुसरे संस्थापक कार्ल पै (Carl Pei) या कारणानेच बाहेर पडले असतील असं आता बोललं जात आहे. Never Settle घोषवाक्य असलेली कंपनीने आता Settle करायला सुरुवात केली आहे असं Tech यूट्यूबर्ससुद्धा बोलू लागले आहेत. या नव्या भागीदारीमुळे तर वनप्लसमार्फत आता ओप्पोचेच फोन्स विकले जातील हे स्पष्टच आहे. एका अर्थाने दोन्ही कंपन्या आधीपासूनच एकत्र काम करत होत्या आता त्यांनी ते अधिकृत केलं इतकाच काय तो फरक…!
अधिकृत पोस्ट : https://forums.oneplus.com/threads/a-new-journey-for-oneplus.1454492