प्रसिद्ध सोशल मीडिया वेबसाइट्स फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप बंद होणार असल्याची चर्चा आज दिवसभर पाहायला मिळत आहे. या चर्चेस कारण की इलेक्ट्रॉनिक्स व इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी मंत्रालयाने सोशल मीडियासाठी नवे नियम तयार केले होते आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. याची मुदत २५ मे २०२१ म्हणजे आज संपणार आहे. मात्र अजूनही फेसबुक, ट्विटर अशा कुठल्याच कंपन्यानी अद्याप यांची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या सद्यस्थितीत उद्यापासून ह्या वेबसाइट बंद होऊ शकतात. पण खरंच असं होईल का? तर नाही. असं होणं शक्य नाही.
फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या नियमानुसार सरकारतर्फे आक्षेप किंवा तक्रार आल्यावर ३६ तासात तो कंटेंट प्लॅटफॉर्मवरुन हटवावा लागेल अशा प्रकारची बंधणं घालण्यात आली आहेत.
तर आता याची पार्श्वभूमी तुम्हाला लक्षात आली असेलच. तर या वेबसाइट्स उद्यापासून लगेच बंद पडतील का तर नाही असं काहीही होणार नाही. कोट्यवधी लोक वापर करत असलेल्या सेवांचा असा अचानक वापर थांबवणाऱ्या देशांपैकी आपला देश नाही. यांना आणखी काही वेळात मुदत वाढवून दिल्याचं पत्रक जाहीर होईल असा अंदाज आहे. त्यानंतर काही दिवसात किंवा महिन्यात या वेबसाइट त्यांना सांगण्यात आलेले बदल करतील आणि जर त्यांना ते करायचे नसतील तर ते पुढे कोर्टकचेरी वगैरे कायदेशीर गोष्टी होत जातील.
त्यामुळे उद्यापासून तांत्रिकदृष्ट्या सरकार नियम न पाळल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करू शकत असलं तरी या वेबसाइट्स वापर तुम्ही नेहमीप्रमाणे करत राहू शकाल. जर चुकून या वेबसाइट बंद करण्याचं धाडस सरकारने केलंच तर त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल आणि ह्या नियमांसाठी सरकार एव्हढं मोठं पाऊल उचलेल असं वाटत नाही. मुळात हे नियमच अद्याप पूर्णपणे कायदेशीर चौकटीत वाटत नाहीत. बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशानेच वापर होणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे कोर्टात प्रकरण जाताच तिथे हे विषय उभे राहणारच आहेत. शिवाय ह्या मोठ्या अमेरिकन कंपन्या आहेत त्यांच्या बंदी घातली तर उद्या अमेरिकाही नाराज होईल.
Koo (कू) नावाचा भारतीय प्लॅटफॉर्म जो ट्विटरप्रमाणे काम करतो त्यांनी मात्र हे नियमांची पूर्तता केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटर अशा कंपन्यांनी मात्र यावर अद्याप काही बदल केलेला नाही. या कंपन्यांनी सहा महिन्यांचा कालावधी मागून घेतला आहे पण त्यावर सरकारतर्फे अजून उत्तर देण्यात आलेलं नाही.
फेसबुकने असं सांगितलं आहे की आम्ही सरकारच्या नियमांचं पालन करणार आहोतच मात्र याबाबत असलेल्या काही शंकांसाठी सरकारसोबत बोलणी सुरू आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर यूजर्सना सुरक्षित आणि मुक्तपणे व्यक्त होता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू.
सध्या ट्विटरसोबत भारत सरकारचा वाद सुरू आहे. त्यांना काही राजकीय बाबतीत पक्षीय वादांमध्ये दिल्ली पोलिसांकडून नोटिस बजावण्यात आली आहे. त्यांचं पुढं काय होईल ते येत्या काळात कळेल पण उद्यापासून या वेबसाइट्स बंद होणार नाहीत हे मात्र नक्की. तूर्तास क्लिकबेट असणाऱ्या बातम्याचा पुर येतोय तो पाहू शकताच.
सोशल मीडिया साठी महत्वपूर्ण नियम :
१. नियमांचं पालन केलं जात आहे ना हे पाहण्यासाठी भारतीय नागरिक असलेला chief compliance officer नियुक्त करा.
२. कायदा अंमलबजावणी पाहणाऱ्या संस्थासोबत २४x७ कायम संपर्क असलेला nodal contact person नियुक्त करा.
३. तक्रार निवारण करण्यासाठी एक अधिकारी नियुक्त करा.
या सर्वांना दर महिन्याला तक्रारींवर काय कार्यवाही केली त्याची माहिती द्याची लागेल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी नियम
१. कोर्ट किंवा सरकारने सांगितल्यावर एखादं ट्विट/मेसेज प्रथम कुणी पोस्ट केला आहे ते सांगावं लागेल.
२. यूजर्सना स्वतः व्हेरीफीकेशन करता येण्याची सोय हवी.