ओला या कॅब सेवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कंपनीने गेल्या वर्षी ओला इलेक्ट्रिक सुरू करून त्याअंतर्गत ई स्कूटर सादर करत असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी त्यांनी अॅमस्टरडॅम येथील Etergo नावाच्या स्टार्टअपचं अधिग्रहण केलं आहे. ही कंपनी AppScooter नावाची ईलेक्ट्रिक स्कूटर बनवते. ओलाने आज जाहीर केलेल्या स्कूटरच्या फोटोनुसार ही स्कूटर मॅट ब्लॅक रंगात उपलब्ध होईल. स्कूटर आणि कंपनीच्या तामिळनाडूमधील मेगाफॅक्टरीची माहिती ओलाचे प्रमुख भावीश अगरवाल यांनी जाहीर केली.
त्यांच्या तामिळनाडूमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फॅक्टरीची आणखी माहिती आज सांगण्यात आली आहे. ही फॅक्टरी जगातील सर्वात मोठी दुचाकी/टू व्हीलर गाड्या बनवणारी फॅक्टरी असेल. येथे तब्बल ३००० AI आधारित रोबॉट्स काम करत आहे. जून २०२१ पर्यंत येथे वर्षाला जवळपास २० लाख गाड्या तयार करता येतील अशी क्षमता पाहायला मिळेल. २०२२ पर्यंत ही संख्या वाढून तब्बल १ कोटी वर पोहचेल अशा विश्वास ओला तर्फे व्यक्त करण्यात आला आहे! सध्या दुचाकी वाहनांची निर्मिती हेच ध्येय असलं तरी पुढे चारचाकी वाहनांचीही निर्मिती येथे होऊ शकते!
ओलाची तामिळनाडूमधील फॅक्टरी तब्बल ५०० एकर जागेवर पसरली असून यामधील १०० एकर जागेवर जंगल/झाडे लावून कंपनीचं कार्बन नेगेटिव ऑपरेशन्स सुरू करण्याचं ध्येय आहे. एव्हढया मोठ्या प्रमाणात निर्मिती क्षमता ठेवत असल्यामुळे साहजिकच ओलाने मोठ्या तयारीने या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे हे स्पष्टच आहे. त्याची स्पर्धा Ather, Bajaj, TVS आणि लवकरच Hero अशा कंपन्यांसोबत असेल.
अलीकडे ईलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत चाललेली मागणी पाहून चारचाकी निर्माण करणाऱ्या कंपन्यासुद्धा मोठ्या प्रमाणात ईलेक्ट्रिक कार्स आणत आहेत. आता दुचाकीसाठीही स्पर्धा सुरू झाली आहे. पर्यावरणाचा विचार करता ही गोष्ट नक्कीच चांगली ठरणार आहे. आता फक्त गरज आहे ती यासाठी चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध करून देण्याची…