गूगल क्रोम (Chrome) या लोकप्रिय ब्राऊजरमध्ये आता डेस्कटॉप सह फोन्सवरही टॅब ग्रुपिंगचा (Tab Groups) पर्याय येत आहे. यामुळे आपण एका विषयावरील किंवा प्रकारानुसार किंवा आवडीनुसार टॅबचा ग्रुप करून ठेऊ शकतो. यामुळे टॅब बारवरती बरीच जागा उपलब्ध होते आणि ग्रुप्स गरजेनुसार क्लिक केल्यावरच expand होतात.
डेस्कटॉपवर ही सोय उपयोगी असली तरी फोन्ससाठी नवा लेआउट असून एका वेबसाइटवरून क्लिक करून दुसऱ्या वेबसाइटवर जात असताना त्यांचा आपोआप ग्रुप तयार होत आहे. नवी टॅब उघडल्यावर सुद्धा हा नवा ग्रिड लेआऊट उघडला जातोय. यामुळे यूजर्समध्ये बऱ्यापैकी संभ्रम निर्माण होत असून गूगलने फोन्समधील टॅब ग्रुपचं डिझाईन सोपं केलेलं नाही असं मत अनेकांनी नोंदवलं आहे.
फोन आणि डेस्कटॉपमधील क्रोम टॅब ग्रुप्समधील सुविधा सुद्धा वेगळ्या आहेत. फोनमध्ये अद्याप टॅब ग्रुपला नाव देता येत नाही. ही सोय सध्या अपडेट्स द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. तुम्हाला अद्याप नवा लेआऊट दिसत नसेल तर येत्या काही दिवसात तो अपडेट केल्यावर दिसू लागेल.