फ्लिपकार्टने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांच्या ॲपवर इंग्लिश, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड नंतर आता मराठी भाषेचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय ग्राहकांना इंटरनेट वर वस्तु खरेदी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन तो त्रास दूर करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे असं फ्लिपकार्टतर्फे सांगण्यात आलं आहे.
गेले अनेक महिने अनेक मराठी ग्राहकांकडून ट्विटरवर यासंबंधी मागणी केली जायची. तमिळ, तेलुगू, कन्नड भाषाही जोडल्या गेल्या मात्र मराठी मात्र अजूनही जोडण्यात आली नव्हती. मराठीसाठी कार्य करणारे लोक आणि अनेक संघटनाही यासाठी प्रयत्नशील होत्या. दिवाळीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या कार्यकर्त्याकडून याची मागणी करण्यात आली. यासाठी पक्षातर्फे अखिल चित्रे यांनी विशेष पुढाकार घेऊन फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन दोघांनाही याबद्दल निवेदन देऊन मागणी करण्यात आली. दोन्ही वेबसाइटच्या अधिकाऱ्यांनी दिवाळीनंतर समावेश करू असं आश्वासन दिलं.
दिवाळी झाल्यावरही अनेक दिवस होऊनही काही कार्यवाही झाली नव्हती. फ्लिपकार्टने किमान Coming Soon चा पर्याय दर्शवला होता. मात्र आता शेवटी आजपासून (खरेतर काही दिवसांपूर्वीच) मराठी भाषा फ्लिपकार्टमध्ये उपलब्ध झाली आहे. तुम्ही ॲप अपडेट करून डावीकडे स्वाईप करून Change Language पर्याय निवडा आणि आलेल्या यादीतून मराठी निवडा.
भारतीय भाषांमध्ये वाढत चाललेला इंटरनेटचा वापर आता अनेकांना दिसून येत आहे. २०२१ मध्ये भारतातील इंटरनेट यूजर्समधील ७५ टक्के यूजर्स भारतीय भाषांमध्ये वापर करत असतील असं सांगण्यात येत आहे. फ्लिपकार्ट आणखी भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देऊन आम्हाला लाखो भारतीयांना इ कॉमर्स वेबसाइट्सचा नवा पर्याय द्यायचा आहे असं फ्लिपकार्टचे अधिकारी जयेंद्र वेणुगोपाल यांनी सांगितलं आहे. प्रादेशिक भाषांमध्ये मराठीचा समावेश करणे म्हणजे ई-कामॅर्स अधिक सर्वसमावेशक करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे आणि भाषेची अडचण दूर करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असेल.
दिवाळीनंतर ॲमेझॉनने मात्र महाराष्ट्रात मराठी भाषेत सेवा दिलीच पाहिजे असा काही नियम नाही असा कांगावा करण्यास सुरुवात करून उलट पक्षाच्या कार्यकर्त्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला. त्यानंतर मनसेने त्यांच्या नेहमीच्या मार्गाने पावले उचलली. #NoMarathiNoAmazon मोहीम चालवली आणि मग प्रकरण हाताबाहेर जाऊ लागताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग आली आणि येत्या काही दिवसात ॲमेझॉनवरही मराठी भाषा देण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. त्याबद्दल अधिक ॲमेझॉनवर मराठी उपलब्ध झाल्यावर बोलता येईल. तूर्तास फ्लिपकार्टवर मराठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद. जर कंपन्यांनी आधीच अनेक महिने मागणी करणाऱ्या युजर्सचं म्हणणं ऐकलं असतं तर असे वादग्रस्त प्रकार घडलेच नसते.
महाराष्ट्रात सेवा पुरवणाऱ्या सर्वच कंपन्यांनी मराठी भाषेत सेवा द्यायलाच हवी. महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशात सर्वच राज्यांमध्ये त्या त्यात ठिकाणच्या राज्य भाषांचाच वापर प्रामुख्याने व्हायला हवा. सर्व्हिस सेंटर्स, कॉल सेंटर्समध्ये त्या त्या भाषांमधील पर्याय असल्यास अनेकांना ते वापरणं सोपं होणार आहे. मराठीत मागणी झाल्यामुळे मराठीच्या वाढीस हातभार लागून स्थानिक लोकांना संबंधित नोकऱ्या मिळण्यासाठी मदत होईल. यामागचं अर्थकारण लोक लक्षात घेऊन अधिकाधिक सेवांमध्ये मराठीची मागणी करून मराठीचासुद्धा वापर करतील असं चित्र दिसलं पाहिजे.