WWDC 2020 वेळी जाहीर केल्याप्रमाणे ॲपलने इंटेलऐवजी स्वतः तयार केलेली ARM आधारित सिलिकॉन प्रोसेसर नव्या मॅकबुक्समध्ये जोडले आहेत. नव्या चिपचं नाव M1 असं देण्यात आलं याचा समावेश नव्या MacBook Air, MacBook Pro आणि Mac Mini मध्ये करण्यात आला आहे. या चिपमध्ये १६०० कोटी ट्रांजिस्टर असून 8 Core CPU आहे. नव्या मॅकबुक प्रोची भारतातली किंमत १२२९०० पासून सुरू होईल. मॅक मिनीची ६४९०० आणि मॅकबुक एयरची ९२९०० पासून सुरू होईल. ॲपलच्या वेबसाइटवर यांची प्रिऑर्डर सुरू झाली आहे.
ॲपलची नवी ऑपरेटिंग सिस्टम macOS Big Sur १२ नोव्हेंबरपासून उपलब्ध होणार आहे.
नवा मॅक मिनी आधीच्या मॅक मिनीपेक्षा ३ पट आधी वेगवान CPU असलेला आहे. ॲपलच्या म्हणण्यानुसार हा मॅक मिनी सध्याच्या प्रतिस्पर्धी विंडोज पीसीसोबत तुलना करता 1/10 आकाराचा असून ५ पट वेगवान आहे.
नव्या 13 inch MacBook Pro मध्ये ५ पट अधिक वेगवान ग्राफिक्स आहे. याची बॅटरी लाईफ १७ तासांची असेल असं सांगण्यात आलं आहे!
ॲपलने आज झालेल्या कार्यक्रमात बऱ्याचदा विंडोज पीसी पेक्षा अमुक पटीने वेगवान असं सांगितलं पण तुलनेसाठी त्यांनी कोणतं हार्डवेअर असलेला पीसी वापरला याची माहिती दिली नाही. केवळ सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या पीसी पेक्षा वेगवान असं सांगण्यात आलं. आता तुलना करायची तर एखादी गोष्ट सर्वाधिक विकली जात असेल म्हणून ती त्या प्रकारची सर्वोत्तम वस्तू आहे असं म्हणता येत नाही. उदा. भारतात काही महीने शायोमीचे फोन्स सर्वाधिक विकले गेले म्हणून कोणी ते आयफोनपेक्षा चांगले आहेत असं म्हणेल का ? यामुळे ॲपलने कालच्या कार्यक्रमात काही प्रमाणात फसवं मार्केटिंग केलं हे उघड आहे. काही ग्राफ दाखवण्यात आले ज्यांना रेषांव्यतिरिक्त काही अर्थच नव्हता.