गूगलने महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागासोबत भागीदारी करत असल्याचं जाहीर केलं असून याद्वारे त्यांच्या G Suite For Education आणि Google Classroom या सेवा महाराष्ट्रातील शाळांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत! या सेवा एक लाखांहून अधिक शाळांमध्ये जोडल्या जाणार असून यामधून २.३ कोटी विद्यार्थी आणि शिक्षकांना फायदा होणार आहे असं गूगलतर्फे सांगण्यात आलं. सध्याच्या COVID19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ऑनलाइन शिक्षण हा शिकण्यासाठी उत्तम पर्याय आहे. गूगलच्या या सेवांमुळे शिक्षकांना शिकवणं आणि विद्यार्थ्यांना शिकणं नक्कीच सोपं होणार आहे.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी अशी माहिती दिली की गूगल क्लासरूमच्या ट्रेनिंगसाठी आम्ही ज्यावेळी Invitation Link पाठवल्या त्यावेळी अवघ्या दोन दिवसात तब्बल १.३४ लाख शिक्षकांनी यामध्ये साईन अप केलं होतं! यावरून या गूगल क्लासरूम माध्यमाद्वारे शिकवण्यास शिक्षक किती उत्सुक आहे हे दिसून येतं. आमच्या शिक्षकांनी डिजिटल शिक्षणासाठी बदल करण्यात पुढाकार घेतल्याचं लक्षात येईल.
गूगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला अभिमान वाटतो असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचंही त्यांनी यावेळी अभिनंदन केलं आहे. यावेळी झालेल्या लाईव्हस्ट्रीममध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गूगल इंडियाचे प्रमुख संजय गुप्ता हे सहभागी झाले होते.
गूगलचे शिक्षण संबंधित टूल्स आता महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि शिक्षक दोघांना मोफत उपलब्ध असतील. मराठी भाषेतून शिक्षणासाठीही यामध्ये पर्याय दिलेले आहेत. यासोबत गूगलने काल जाहीर केलेल्या माहितीनुसार Teach From Anywhere अंतर्गत The Anywhere School नावाचा ऑनलाइन कार्यक्रम ११ व १२ ऑगस्ट रोजी होणार आहे. जगभरातील विचारवंत यामध्ये सहभागी होऊन ऑनलाइन शिक्षणाबद्दल त्यांचं मत मांडतील.
लिंक : https://teachfromanywhere.google