होय इलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक (Neuralink) तर्फे काल त्यांच्या मानवी मेंदूत चिप बसवून त्यानुसार आज्ञांची देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल टाकलं. याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ते सध्या खास पाळलेल्या डुकरांचा वापर करत आहेत. एका नाण्याच्या आकाराची चिप या डुकरांच्या मेंदूत बसवण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्यामध्ये पाहण्यात येणारे बदल नोंदवले जात आहेत. येणाऱ्या काळात मानवी चाचण्या घेऊन यांचा प्रत्यक्ष वापर सुद्धा सुरू होऊ शकतो.
२०१६ मध्ये इलॉन मस्कने सुरवात केलेल्या या Neuralink कंपनीला वायरलेस कम्प्युटर मानवी मेंदूत बसवायचा आहे जो हजारो इलेक्ट्रोड्स वापरुन तयार केलेला असेल. यामुळे मेंदू संबंधित अल्झायमर्स, डिमेंशिया व स्पानल कोर्ड इजा अशा आजारांना बरं करणं सोपं होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. यासाठी बसवण्यात येणाऱ्या चिपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला असेल. याची बॅटरी एक दिवस जाईल त्यानंतर याला inductively चार्ज करता येतं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लिंक बसवण्याची प्रक्रिया एका तासाच्या आत पूर्ण होऊ शकते. रुग्ण त्याच दिवशी घरी परत जाऊ शकतो. याची मानवी चाचणी लवकरच करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे!
यावर सोशल मीडियावर अनेकांनी चिंतासुद्धा व्यक्त केली आहे. या चिप बसवण्याच्या कल्पनेची तुलना करताना नेटफ्लिक्सवरील ब्लॅक मिररनावाच्या मालिकेत पाहायला मिळणाऱ्या कथेशी साधर्म्य दिसत आहे असं मत अनेकांनी नोंदवलं आहे.