ॲपलने आता iPhone 11 या त्यांच्या फोनची निर्मिती भारतात सुरू केली आहे. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज ट्विटद्वारे ही माहिती दिली! यापूर्वी iPhone XR ची जोडणी भारतात केली जायची आता आयफोन ११ चे पार्ट्स भारतात जोडले जाऊन फोन तयार केले जातील. यामुळे ॲपलला बाहेरून फोन आयात करण्यासाठी लागत असलेला २० टक्के टॅक्स द्यावा लागणार नाही. ॲपलच्या निर्मितीसाठी भागीदार असलेल्या Foxconn, Wistron आणि Pegatron या कंपन्यानी अलीकडे भारतातील गुंतवणूक वाढवली आहे.
यामुळे मेक इन इंडियाला मोठी चालना मिळेल असं मंत्री गोयल यांनी म्हटलं आहे. भारतात सध्या सुरू असलेल्या चीनी फोन्सच्या विरोधामुळे चीनी कंपन्या सुद्धा भारतात किमान फोन्सची जोडणी करण्यास सुरुवात करताना दिसत आहेत. आता यामध्ये चीनी नसलेल्या ॲपलने फोन निर्मिती सुरू केली आहे. आता ॲपलचे आयफोन्स भारतात काही प्रमाणात नक्कीच स्वस्त होतील आणि पर्यायाने त्यांचा भारतातला ग्राहकवर्ग वाढण्यास मदत होईल.
यानंतर Wistron च्या बेंगळुरू प्लांटमध्ये iPhone SE चंसुद्धा मॅन्युफॅक्चरिंग करण्याचं नियोजन असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थात ॲपलने अधिकृतरित्या किंमती कमी होतील असं सांगितलं नाही मात्र किंमती कमी करणं आता त्यांना सहजशक्य आहे.
माहितीसाठी : Manufactured in India आणि Assembled in India या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. Assembled in India म्हणजे बाहेरून पार्ट्स मागवून भारतात फक्त जोडून देऊन विक्री केलेल्या वस्तु तर Manufactured in India म्हणजे जय वस्तू भारतातच तयार पण करण्यात आल्या आहेत आणि जोडण्यातसुद्धा भारतातच आलेल्या आहेत.