ॲपलने काल डेव्हलपरसाठी असलेल्या WWDC 2020 कार्यक्रमात त्यांच्या विविध उपकरणांसाठी नवे सॉफ्टवेअर अपडेट्स जाहीर केले आहेत. यंदा प्रथमच कोरोनामुळे हा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला आहे! आयफोन्ससाठी iOS 14, मॅकसाठी MacOS Big Sur, आयपॅडसाठी iPadOS 14 आणि यांच्यामधील जोडल्या जाणाऱ्या सुविधा यांची माहिती व्हिडिओद्वारे देण्यात आली आहे. सोबत ॲपलने असंही जाहीर केलं आहे की आता त्यांच्या मॅक उपकरणांसाठी ते इंटेल ऐवजी स्वतः तयार केलेले ॲपल सिलिकॉन प्रोसेसर चिप्स वापरणार आहेत!
iOS 14 : ॲपलच्या आयफोन्ससाठी असलेली ऑपरेटिंग सिस्टम iOS मध्ये आता अनेक नव्या सोयी जोडल्या जाणार आहेत. होमस्क्रीनवर विविध विजेट्स जोडता येणार आहेत. अँड्रॉइडवर अनेक वर्षांपासून असणारी ही सोय आता आयफोनवरही वापरता येईल. खरतर याची अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. Picture-in-picture द्वारे इतर ॲपसुरू असतानाही आपण व्हिडिओ पाहणं सुरू ठेऊ शकतो. ही सुद्धा सोय बऱ्याच अँड्रॉइड फोन्सवर उपलब्ध आहे!
मेमोजीमध्येही आता नव्या मेमोजी आणि नवे पर्याय मिळतील!
ॲपल मॅप्समध्येही नवे अपडेट्स येणार असून सायकलिंग आणि इलेक्ट्रिक कार्ससाठी चार्जिंग ठिकाणे यांची माहिती नव्या प्रकारे उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सोबत आता ॲपल डिजिटल कार की आणत असून यामुळे तुम्हाला कारची चावी जवळ बाळगण्याची गरज उरणार नाही. तुमच्या आयफोनद्वारेच तुम्ही सुरक्षितरीत्या कार लॉक अनलॉक करू शकाल! NFC आधारित BMW कारपासून याची सुरुवात होणार आहे. यासह आपली कारची डिजिटल चावी इतरांसोबत शेयरसुद्धा करता येईल आणि त्यासाठी परवानगी देताना त्यावर मर्यादासुद्धा ठेवता येईल!
iPadOS 14 : आयपॅडसाठीच्या या ओएसमध्येही काही नव्या गोष्टी जोडल्या जाणार असून iOS प्रमाणेच इथेही होमस्क्रीनवर विजेट्स जोडता येतील! ॲप नॅविगेशन सोपं होण्यासाठी नवा साइडबार देण्यात आला आहे. सर्चमध्येही नवे पर्याय आले आहेत. Scribble नावाच्या सुविधेद्वारे आयपॅडवर कुठेही ॲपल पेन्सिलने टेक्स्ट लिहू शकाल हाताने लिहलेला टेक्स्ट आपोआप टाइप केला जाईल.
AirPods : एयरपॉड्स आता तुमच्याकडीउपकरणात ऑडिओ सुरू झाला असेल त्याला आपोआप स्विच करून त्यामधून आपोआप आवाज ऐकवेल! Spatial audio सुद्धा देण्यात येणार असून यामुळे ऑडिओ अनुभव अधिक चांगला होईल आणि प्रत्यक्ष त्या जागी असल्याचा अनुभव येईल.
WatchOS 7 : ॲपल वॉचसाठीच्या या ओएसमध्ये आता स्लीप ट्रॅकिंग जोडलं जाणार आहे ज्यामुळे तुम्ही कधी झोपी गेला, किती वेळ झोपला याची नोंद होत राहील! सोबत आपण हात धुण्याचीसुद्धा नोंद होणार असून अपेक्षित वेळ हात धुतला नसेल तर घडयाळ आणखी वेळ हात धुण्यास सुचवेल! सध्याच्या काळात हँडवॉश करणं महत्वाचं असल्यानं नक्कीच उपकयउक्त ठरणार आहे!
MacOS Big Sur : MacOS च्या या आवृत्तीमध्ये अनेक डिझाईन बदल पाहायला मिळणार असून आयपॅडप्रमाणे आयकॉन्स, सेटिंग्स दिसतील जेणेकरून विविध उपकरणे वापरताना सहजता जाणवावी!
Apple Silicon : ॲपलने गेली अनेक वर्षे इंटेलचेच प्रोसेसर वापरले असून आता ते त्यांच्या लॅपटॉप/डेस्कटॉप कम्प्युटर्ससाठीही आयफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्वतः तयार केलेल्या चिप्स/प्रोसेसरच्या आवृत्त्या वापरणार आहे. ॲपलचे हे स्वतःचे प्रोसेसर ॲपल सिलिकॉन या नावाने ओळखले जातील. यामुळे फायनल कट प्रो सारखे सॉफ्टवेअर सुद्धा नेटिव्ह ॲप्सप्रमाणे थेट वापरता येतील! यामुळे कामगिरीसुद्धा सुधारित असेल.