कोरोनामुळे सध्या सुरू असलेलं लॉकडाऊन आता १७ मे पर्यंत पुढे वाढवण्यात आलं आहे. मात्र या लॉकडाऊन दरम्यान आता बऱ्याच गोष्टी उपलब्ध करून देण्याची मुभासुद्धा जाहीर करण्यात आली आहे. ई कॉमर्स वेबसाइट्स जसे की फ्लिपकार्ट, अॅमेझॉन यांना आजपासून म्हणजे ४ मेपासून ऑनलाइन शॉपिंग सेवा सुरू करता येतील. ४ मेच्या आधीपर्यंत केवळ जीवनावश्यक/किराणा वस्तूच विक्रीस उपलब्ध ठेवण्यात आल्या होत्या आता मात्र फोन्स, लॅपटॉप्स, इ सर्व प्रकारच्या एरवी ऑनलाइन मिळणाऱ्या वस्तू मिळण्यास सुरुवात होईल.
महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या सुचनांनुसार विविध प्रकारची दुकाने, ऑनलाइन दुकाने सुरू करता येतील. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंचीही विक्री ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमात सुरू होत आहे. रेड झोनमध्ये मात्र अजूनही जीवनावश्यक नसलेल्या गोष्टी विक्री करण्यास बंदी आहे याची नोंद घ्यावी.
ग्रीन व ऑरेंज झोन ही अशी ठिकाणे आहेत जिथे कोरोना रुग्ण आढळले नाहीत किंवा त्यांचं प्रमाण अत्यल्प आहे. रेड झोनमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे त्यामुळे तिथे जास्त काळजी घेणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन तिथे विक्री बंद राहणार आहे. तरी यासंबंधी तुमच्या जिल्ह्यात वेगळा निर्णय झालेला असू शकतो कृपया अधिकृत माध्यमांवर खात्री करूनच वस्तू खरेदी करा.
मराठीटेकतर्फे आमचं आवाहन असं असणार आहे की सध्या फारच गरज असेल तरच ऑनलाइन वस्तू खरेदी करा.वस्तू डिलिव्हरीच्या माध्यमातून कोरोना पसरल्याच्यासुद्धा काही घटना झाल्या आहेत. कंपनीने कितीही काळजी घेतली तरी प्रत्यक्षात कधी कसा प्रसार होईल हे सांगता येत नाही.