गूगल मॅप्स या सेवेमध्ये आता नवी सोय जोडण्यात आली असून याद्वारे आपल्याला आपल्या लोकेशनवर आधारित एक सहा अंकी कोड तयार करून मिळेल आणि मग तो आपण इतरांसोबत सहज शेयर करू शकतो. या कोडला प्लस कोड (Plus Code) असं म्हटलं जातं. हे कोड काही महिन्यांपूर्वीच उपलब्ध झाले आहेत मात्र यांचा वापर फार कमी प्रमाणात होतो. आता गूगलने थेट पर्याय देऊन आणखी वापर होईल अशा दिशेने पाऊल टाकलं आहे. हा पर्याय गूगल मॅप अॅपमध्ये आपली लोकेशन दाखवणाऱ्या निळ्या आयकॉनवर क्लिक केल्यावर दिसेल!
प्लस कोड पत्ता सांगणं अवघड असेल अशा जागा सांगण्यासाठी वापरले जात आहेत. आता पूर्ण पत्ता सांगत बसण्यापेक्षा आपण केवळ हा प्लस कोडसुद्धा पाठवू शकता. त्याद्वारे अत्यावश्यक सेवा गरजेच्या असतील अशा वेळी त्या नेमक्या जागेवर पोहोचणं सोपं होईल. अत्यावश्यक सेवा, वस्तूंची डिलिव्हरी किंवा इतर कोणी आपला पत्ता शोधत घरी येत असताना हे प्लस कोड त्यांचं काम सोपं करतील अशा उद्देशाने तयार करण्यात आले आहेत. सोबतच जगातील अनेक असे लोक आहेत जे कमी जागेत मोठ्या संख्येने असलेल्या छोट्या घरांमध्ये राहतात. अशा जागी लोकेशन शोधणं अवघड जातं त्यासाठीही हे प्लस कोड्स उपयोगी ठरतील.
अर्थात यांचा वापर अधिकाधिक प्रमाणात व्हायला हवा. यामागचं तंत्रज्ञानसुद्धा ओपन सोर्स करण्यात आल्यामुळे कोणीही हे मोफत वापरू शकेल.
तुम्ही जर गूगल मॅपमध्ये लक्ष दिलं असेल तर ठिकाणांची माहिती पाहताना फोन नंबर, वेबसाईट अशा माहितीसह प्लस कोड्ससुद्धा दिसतात.
मराठीटेकनेही २०१८ मध्ये या प्लस कोड्सची माहिती दिली होती.
प्लस कोड माहितीसाठी अधिकृत वेबसाइट : https://plus.codes
प्लस कोड्स नेमकं काय काय कशा प्रकारे काम करतील हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा.