मायक्रोसॉफ्टने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या माहितीनुसार विंडोज १० ही ऑपरेटिंग सिस्टम आता तब्बल १०० कोटी डिव्हाईसेसवर (कम्प्युटर्स, लॅपटॉप्ससोबत इतर उपकरणे एकत्र धरून) अॅक्टिव्ह आहे! मायक्रोसॉफ्टचे कॉर्पोरेट व्हाईस प्रेसिडेंट यूसुफ मेहदी यांनी यावेळी असं सांगितलं “आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की २०० देशातल्या १०० कोटीहून अधिक व्यक्तींनी आता विंडोज १० ची निवड केली आहे!”
या १०० कोटींमध्ये मायक्रोसॉफ्ट सेवा पुरवत असलेली विविध प्रकारची उत्पादने येतात जसे की पर्सनल कम्प्युटर्स, लॅपटॉप्स, एक्सबॉक्स गेमिंग कॉन्सोल, होलोलेन्स, सर्फेस उपकरणे, इ. विंडोज १० सादर झाल्यावर मायक्रोसॉफ्टने एक ध्येय समोर ठेवलं होतं की १०० कोटी डिव्हाईसेसवर विंडोज १० ठेवायचंच… ठरवलेल्या ध्येयाच्या अपेक्षित वर्षापासून दोन वर्षांचा उशीर होऊन का होईना मायक्रोसॉफ्टने त्यांचं ध्येय गाठलं आहे. यासोबत मायक्रोसॉफ्टने हे सुद्धा जाहीर केलं आहे की त्यांच्याकडे आता तब्बल 1.78 कोटी विंडोज इनसाइडर टेस्टर्स म्हणजे विंडोजची चाचणी करणारे लोक आहेत!
मायक्रोसॉफ्टला लॉंचनंतर तीं वर्षात हा टप्पा गाठायचा होता मात्र विंडोज फोनच्या अपयशामुळे त्यांना हा दोन वर्षांचा उशीर झाला आहे. अँड्रॉइड व iOS समोर विंडोज फोन ऑपरेटिंग सिस्टमचा निभाव लागला नाही. अन्यथा त्यांनी हा टप्पा बऱ्याच आधी गाठला असता. विंडोज १० ही आता एकमेव अशी ऑपरेटिंग सिस्टम आहे जी १००० हून अधिक कंपन्यांच्या ८०००० हून मॉडेल्स मध्ये जोडण्यात आलेली आहे!
विंडोज १० इंस्टॉल कसं करायचं याबद्दल मराठीटेकचा सोपा व्हिडिओ : https://youtu.be/cYjixgDtTiU
विंडोज ७ वर बरीच उपकरणे अजूनही काम करत आहेत. अलीकडे सुरक्षेच्या दृष्टीने विंडोज ७ पासून विंडोज १० वर अपग्रेड करण्याच वाढलेलं प्रमाण विंडोज १० ला हा टप्पा गाठण्यात मदत करणारं ठरलं. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात सतत घसरत गेलेलं कम्प्युटर मार्केट गेल्या काही महिन्यात अल्प प्रमाणात का होईना वर आलेलं दिसून येत आहे! लवकरच विंडोजचं नवं अपडेट येत असून Windows 10 May 2020 Update असं याचं नाव असेल…
४ एप्रिल १९७५ म्हणजे कालपासून ४५ वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टची सुरुवात झाली होती. मध्यंतरी बऱ्यापैकी घसरत गेलेली कंपनी आता सत्या नाडेला यांच्या नेतृत्वात बरेच बदल स्वीकारत पुन्हा एकदा पुढे आली आहे काही महिन्यापूर्वीच शेयर बाजारात ट्रिलियन डॉलर्सचं भागभांडवल सुद्धा कंपनीने गाठलं होतं! अनेक वर्षं विनाकारण काही गोष्टींना चिकटून बसण्याची सवय मोडत बदलत्या काळानुसार निर्णय घेतल्याने आता मायक्रोसॉफ्ट पुन्हा एकदा सर्वोच्च स्थानी पोहोचली आहे. आता हा लेख लिहीत असताना सुद्धा मायक्रोसॉफ्ट (MSFT) जगातील सर्वात मोठं मार्केट कॅप असलेली कंपनी आहे त्यानंतर अॅपल, अॅमेझॉन, अल्फाबेट (गूगल), अलिबाबा यांचा क्रमांक लागतो.