सोशल मीडिया कंपनी फेसबुकने आज भारतीय टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओमध्ये ४३५७४ कोटींची गुंतवणूक करून कंपनीमध्ये ९.९९ टक्के हिस्सा/समभाग मिळवला आहे. सध्या भारतातली सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी असलेल्या जिओमध्ये फेसबुकने केलेली ही गुंतवणूक महत्वपूर्ण आहे. जिओचं एकूण भागभांडवल आता ४.६२ लाख कोटींवर गेलं आहे! गेल्या काही महिन्यात याबद्दल चर्चा सुरू होती आणि आज हे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. फेसबुक संस्थापक मार्क झकरबर्ग आणि रिलायन्स प्रमुख मुकेश अंबानी यांनी याबद्दल व्हिडिओ प्रकाशित करून माहिती दिली आहे.
आमची भारताप्रती असलेली वचनबद्धता याद्वारे अधोरेखित करत असून जिओने आणलेल्या नाट्यमय बदलांमुळे आम्ही यासाठी उत्सुक आहोत असं फेसबुकतर्फे एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. प्रामुख्यानं आमचं ध्येय भारतात अधिकाधिक लोकांना नवनवी तंत्रज्ञान द्वारं खुली करून देणं आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. याद्वारे बहुधा त्यांचं लक्ष लहान उद्योगांकडे असेल असं दिसत आहे. बिझनेस टूल्सचा वापर वाढावा असा उद्देश दिसून येतोय.
जिओमार्ट या काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या सेवेची उपलब्धता व्हॉट्सअॅपद्वारे असणार आहे. यामुळे देशातील लहान उद्योगांना विक्रीसाठी नवा प्लॅटफॉर्म मिळणार असून व्हॉट्सअॅपद्वारेच त्यांना विविध उत्पादने विकता येणार आहेत. आपल्या जवळच्या किराणा दुकानदाराशी जिओमार्ट भागीदारी करून व्हॉट्सअॅपद्वारे त्या ऑर्डर्स मॅनेज करेल असं एकंदरीत चित्र आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन विक्रेत्याना स्पर्धा निर्माण करण्याच्या दृष्टीने अंबानींचं आणखी एक पाऊल म्हणता येईल. या जिओमार्टद्वारे ग्राहकांना मोबाइल शॉपिंगसाठी सोपा पर्याय देण्याचा प्रयत्न आहे. मार्क झकरबर्गनेही त्यांच्या व्हिडिओमध्ये नव्या प्रोजेक्ट्सद्वारे येणाऱ्या कॉमर्स संधीबद्दल बोललं आहे.
अपडेट २७-०४-२०२० : जिओमार्टची सेवा नवी मुंबई, कल्याण, ठाणे अशा भागात सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. अनेकांनी ऑर्डरसुद्धा केल्या आहेत. 8850008000 हा फोन क्रमांक सेव्ह करून व्हॉट्सअॅपद्वारे किराणा खरेदी करता येईल. मात्र सध्या होम डिलिव्हरी सुरू झालेली नाही याची नोंद घ्यावी तुम्हाला जिओमार्टसोबत भागीदारी असलेल्या जवळच्या किराणा दुकानात जाऊन आणावं लागेल. पैसेसुद्धा दुकानात जाऊन द्यावे लागणार आहेत. थोडक्यात या ऑनलाइन ऑर्डरला सध्यातरी काही अर्थ नाही.
या गुंतवणुकीमुळे जिओवरील आर्थिक भार किंवा त्यांच्यावरील कर्जाचं ओझं कमी होईल. शिवाय फेसबुकलाही भारतात हातपाय पसरण्यास मदत होईल त्यामुळे दोघांसाठी ही गुंतवणूक फायदेशीरच ठरणार आहे. आता प्रश्न राहिला ग्राहकांचा तर विविध ऑफर्सद्वारे ग्राहक ओढून घेण्याला आतासुद्धा ग्राहक प्रतिसाद देतीलच. मात्र फेसबुकची सध्याची इमेज बघता प्रायवसीबद्दल शंका मनात येतातच. अनेकांनी त्या सोशल मीडियावर मांडल्या देखील आहेत. आपल्या दैनंदिन गोष्टी काही ठराविक कंपनीकडेच घडत असतील आणि त्याचा सर्व डेटा त्यांना वापरण्यास मिळत असेल तर ती गोष्ट ग्राहकांना नक्कीच चांगली नाही मात्र भारतात या गोष्टींकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केलं जाणार आहे हे स्पष्ट आहे…किमान या कंपन्या या प्रोजेक्ट्सच्या निमित्ताने त्यांच्यामध्ये काही बदल करतील अशी निरर्थक आशा बाळगण्यास हरकत नाही.
- मार्क झकरबर्गची पोस्ट : facebook.com/zuck/posts/10111830591845901
- मुकेश अंबानी यांचा व्हिडिओ : https://youtu.be/3QQpYV37OWM