गूगलने त्यांच्या अँड्रॉइड गो या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित फोन्ससाठी नवं कॅमेरा अॅप सादर केलं असून याचं नाव Camera Go असं आहे. अँड्रॉइड गो ऑपरेटिंग सिस्टम कमी क्षमतेच्या स्वस्त फोन्समध्ये गूगलतर्फे अधिकृत अपडेट्स देणारी ओएस आहे. गूगलच्या पिक्सल फोन्सप्रमाणे याही फोन्सना लवकर अपडेट दिलं जातं तेसुद्धा थेट गूगलकडून! गूगलने जाहीर केलेल्या माहितीनुसार अँड्रॉइड गो फोन्सनी आता तब्बल १० कोटी अॅक्टिव यूजर्सचा टप्पा ओलांडला आहे.
तर या अँड्रॉइड गो फोन्ससाठी गूगलने त्यांच्या पिक्सल फोन्सचं वैशिष्ट्य असणारं कॅमेरा अॅप आता सादर केलं आहे. या अॅपद्वारे सोपं सुटसुटीत डिझाईन असलेलं अॅप मिळेल ज्याद्वारे अधिक उत्तम फोटो आणि व्हिडिओ काढता येतील!
कॅमेरा गो अॅप फिल्टर लावून देणाऱ्या अॅप्सप्रमाणे नसून हे ऑपरेटिंग सिस्टममध्येच जोडलेलं असेल. तुमच्या फोनला दोन लेन्स नसल्या तरी एका लेन्सवरही पोर्ट्रेट मोडद्वारे फोटो काढून बॅकग्राउंड ब्लर असलेले फोटो काढता येतील. हीच खरी गूगलच्या AI ची आणि पर्यायाने कॅमेरा अॅपची कमाल आहे! यामुळे सर्वांना अशा प्रकारच्या फोटोग्राफीचा आनंद घेता येईल असं अर्पित मेहता (लीड प्रॉडक्ट मॅनेजर, अँड्रॉइड) यांनी सांगितलं आहे! यामध्ये Night Sight सारख्या सोयी मात्र उपलब्ध होणार नाहीत जे साहजिक आहे कारण या प्रकारचे फोन्स Night Sight सारख्या सुविधा प्रोसेस करू शकणार नाहीत.
हे अॅप नुकत्याच सादर झालेल्या Nokia 1.3 मध्ये उपलब्ध होत आहे. नंतर हळूहळू इतर फोन्सवरही उपलब्ध होईल अशी माहिती आहे.
Search Terms : Google launched Camera Go app for Android Go devices with lower end hardware better camera with portrait effects