अॅपलने आज नवा आयपॅड प्रो जाहीर केला असून हा दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध होतोय. ११ व १२.९ इंची मॉडेल्समध्ये आता सुधारित प्रोसेसर, नवी कॅमेरा सिस्टीम, AR साठी नव्याने जोडण्यात आलेलं LiDAR स्कॅनर तंत्रज्ञान आणि प्रथमच iPad साठी माऊस व ट्रॅकपॅड सपोर्ट देण्यात आला आहे! प्रोसेसिंगसाठी A12Z Bionic हा अद्ययावत प्रोसेसर जोडलेला आहे.
अपडेट ३०-०५-२०२० : हा आयपॅड प्रो आता भारतात उपलब्ध झाला आहे.
यमध्ये 10MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 12MP स्टँडर्ड कॅमेरा असून सोबत LiDAR सेन्सर जोडला आहे जो ऑग्मेंटेड रिअॅलिटी आधारित अॅप्समध्ये खूप मोठी मदत करेल. अॅपलने तर त्यांच्या iPad वर जगातलं सर्वोत्तम AR अनुभवता येतं असा दावा केला आहे. नव्या आयपॅडवर डिस्प्लेसुद्धा 120Hz देण्यात आला आहे!
सर्वांना आवडेल अशी नवी सुविधा जोडण्यात आली आहे ती म्हणजे ट्रॅकपॅड सपोर्ट. यासाठी ऑपरेटिंग सिस्टममध्ये आता कर्सर देण्यात आला आहे जो आपण वापरत असलेल्या अॅपनुसार बदलत जाईल. यासोबत नवा मॅजिक किबोर्ड सादर करण्यात आला आहे जो आता अधिक चांगला अनुभव देऊ शकेल! अर्थात हा वेगळा खरेदी करावा लागेल. या किबोर्डची किंमत ११ इंची आयपॅडसाठी २७९०० आणि १२.९ इंची आयपॅडसाठी ३१९०० इतकी आहे. शेवटी अॅपल अॅपल आहे… या किंमतीचं आश्चर्य तेव्हा वाटेल जेव्हा या किंमती कमी असतील!
या नव्या iPad Pro 2020 ची किंमत ११ इंची मॉडेलसाठी ७१,९०० आणि १२.९ इंची मॉडेलसाठी ८९,९०० इतकी आहे. स्टोरेज व LTE पर्यायानुसार इतर मॉडेल्स उपलब्ध आहेत. मे पासून यांची विक्री सुरू होईल.
नव्या आयपॅड प्रो सोबत आता मॅकबुक एयरचं सुद्धा नवं मॉडेल आलं असून याची किंमत $999 आहे. यामध्ये 512GB स्टोरेज, 8GB रॅम, 10th Gen Ice Lake Y प्रोसेसर, १३ इंची डिस्प्ले मिळेल.