मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस २०२० (MWC) हा बार्सेलोना येथे होणारा मोबाइल विश्वातील सर्वात मोठा कार्यक्रम करोना व्हायरसच्या भीतीमुळे शेवटी रद्दच करण्यात आला आहे. काही दिवस स्थानिकांकडून याबद्दल माहिती मिळत होती मात्र काल GSMA या मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस आयोजित करणाऱ्या संस्थेने अधिकृत माहिती देत यंदाचा MWC रद्द झाला असल्याचं जाहीर केलं.
गेले काही आठवडे चीनमध्ये या व्हायरसच्या प्रसारामुळे अनेकांना लागण होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशामध्ये जगभरात बऱ्याच ठिकाणी चीनमधून परतलेल्या लोकांनाही याची लागण होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. केरळमध्येही तिघेजण या व्हायरसने बाधित असल्याची बातमी आहे. यामुळे हळूहळू एक एक कंपनी आपण यंदाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं जाहीर करत नाव मागे घेऊ लागली. आधी एलजी त्यानंतर Nvidia, ZTE, सोनी, अॅमेझॉन आणि मग इतरांनीही नावे मागे घेतली. यामुळे शेवटी हा कार्यक्रम रद्दच केलेला बरा अशी भावना अनेकजण व्यक्त करू लागले आणि झालंसुद्धा तसंच… अनेकांचा चीनमधून प्रवास, संसर्ग होण्याची शक्यता अशा गोष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
आता २०२१ मध्येच हा कार्यक्रम बार्सेलोनात आयोजित होईल असं जाहीर करण्यात आलं आहे.
मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेस इतकी महत्वाची का आहे? : जगभरातील सर्व प्रमुख कंपन्या त्यांचे विशेष फोन्स याच कार्यक्रमात दरवर्षी जगासमोर सादर करत असतात. सोबतच फोन क्षेत्रात सुरू असलेलं संशोधन, नवं तंत्रज्ञान आणि एकंदर त्या त्या वर्षी येणाऱ्या फोन्सचा अंदाज यामार्फत मिळत असतो. येथे मग भेट देणाऱ्या प्रत्येकाला फोन्स प्रत्यक्ष हाताळण्यास सर्वात आधी मिळतात. हे सर्व एकाच छताखाली एका ठिकाणी करणं कंपन्यानासुद्धा सोपं असायचं. मात्र आता प्रेस रिलीज, इवेंटसारख्या गोष्टी त्या त्या कंपनीला स्वतंत्र करावे लागतील. या कार्यक्रम रद्द होण्याने फोन्स सादर होणार नाहीत अशी गोष्ट नाही पण फोन्सच्या प्रसिद्धीसाठी हा एक उत्तम मार्ग असतो. यावेळी 5G संबंधित उत्पादने मोठ्या प्रमाणावर सादर करण्यात येणार होती.