ATM द्वारे आपल्या नकळत कोणाला व्यवहार करता येऊ नये यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआयने OTP (वन टाइम पासवर्ड) आधारित ATM Withdrawal उपलब्ध करून दिलं आहे. यामुळे एटीएमद्वारे पैसे काढताना तुमच्या लिंक केलेल्या फोनवर एसएमएसद्वारे OTP येईल आणि तो टाकल्याशिवाय तुमचा एटीएम पिन माहीत असला तरीही कोणालाही पैसे काढता येणार नाहीत. कॅश काढण्यासाठी उपलब्ध सुरक्षिततेत एसबीआयकडून आणखी भर घालण्यात आली असून हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे.
ही सेवा १ जानेवारी २०२० पासून उपलब्ध होत आहे. या तारखेपासून रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेदरम्यान केल्या जाणाऱ्या रुपये १०,००० आणि त्यावरील रकमेच्या व्यवहारांवेळी OTP पाठवला जाईल! हा OTP फक्त तुमच्या बँकसोबत जोडलेल्या फोन क्रमांकावरच पाठवला जाईल. OTP मध्ये आपोआप मिसळून तयार केलेले अंक असतील जे एटीएम मशीनमध्ये टाइप करावे लागतील तरच तो व्यवहार पूर्ण होईल. ही सेवा आपोआप जोडली जाणार असून यासाठी ग्राहकांना कोणताही बदल करावा लागणार नाही.
ही सेवा सर्व एसबीआय एटीएमवर उपलब्ध असेल मात्र एसबीआय (SBI) व्यतिरिक्त अन्य कोणत्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढायला गेल्यास तिथे ही सोय उपलब्ध नसेल! कारण ही सोय नॅशनल फायनान्शीयल स्वीच (NFS) मध्ये तयार केलेली नाही. खरतर दुसऱ्या बँक एटीएममध्ये ही सुविधा चालणार नसल्याने हा पर्याय तुमच एटीएम अधिक सुरक्षित करेल ह्या एसबीआयच्या दाव्याला काहीच अर्थ उरत नाही. कारण चोर/ज्या व्यक्तीला न सांगता पैसे काढायवयाचे आहेत तो दुसऱ्या बँक एटीएमला जाऊन पैसे काढू शकेलच. शिवाय या सेवेला देण्यात आलेलं वेळेचं बंधन सुद्धा काहीसं चुकीचं वाटतं. कारण काही ठिकाणी हे गैरसोयीचं ठरेल.
ही सुविधा सर्व बँकानी सुरू केली तरच तिला अर्थ उरेल अन्यथा काही बऱ्यापैकी निरुपयोगीच म्हणावी लागेल. पण निदान या सेवेला इतर बँका देखील सुरू करतील आणि त्या दृष्टीने हे पहिलं पाऊल म्हणता येईल.