काही दिवसांपूर्वीच भारतातील सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांच्या प्लॅन्समध्ये बदल केले असून बऱ्यापैकी दरवाढ केली आहे. हे करताना सर्वानी इतर नेटवर्कवर कॉल्स करण्यासाठी काही मर्यादा आणल्या होत्या. अगदी मोठ्या रकमेचा प्लॅन असेल तरीही काही हजार मिनिटांची का होईना मर्यादा लादण्यात आली होती. आता गेले अनेक महीने पूर्ण मोफत कॉल्स व रोज अमुक जीबी डेटा वापरण्याची सवय झालेल्या युजर्सना अर्थातच ही गोष्ट आवडली नाही मग मग मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्यावर आणखी ग्राहक जिओकडे वळू नयेत या भीतीने एयरटेल, व्होडाफोन, आयडिया यांनी दुसऱ्या ऑपरेटर/नेटवर्कला कॉल केल्यावर घातलेली मिनिटांची मर्यादा आता रद्द केली आहे. जर तुम्ही या तीन ऑपरेटर पैकी कुणाची सेवा वापरत असाल आणि तुम्ही अमर्याद प्लॅनने रीचार्ज केला असेल तर तुम्ही कोणत्याही नेटवर्कला अमर्याद (अनलिमिटेड) व्हॉईस कॉल्स करू शकता.
कालच एयरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या तिन्ही (व्होडाफोन, आयडिया आता एकत्र आहेत) कंपन्यांनी ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्लॅन्समध्ये बदल केल्यावरही सर्वात स्वस्त प्लॅन्स जिओचेच राहिले. आधीच ग्राहकांची गळती होत असताना सध्याच्या ग्राहकांची नाराजी लक्षात घेत आता आणखी एक नवं कारण स्वतःहून दिल्या सारखं वाटलं असावं आणि त्यामुळेच लगेच काही दिवसात मर्यादा घालण्याचा निर्णय बदलण्यात आलेला दिसतोय. इतर नेटवर्कला कॉल्स करण्यासाठी वेगळा रीचार्ज आता जिओ ग्राहकांनाच करावा लागेल. IUC चार्जेसच्या नावाखाली फक्त जिओच ग्राहकांकडून पैसे आकारेल.
याशिवाय तूर्तास जिओसकट सर्वच ऑपरेटर्सचे डेटा प्लॅन्स मात्र महागच आहेत. गेल्या काही दिवसात बदललेल्या नियमांमुळे किंवा सरकारतर्फे आकारण्यात येणाऱ्या दरामुळे टेलिकॉम कंपन्या चिंतेत आहेत. बरेचसे प्लॅन्स ४० टक्क्यानी महाग होऊन त्यांच्यामध्ये मिळणारा डेटा कमी झाला आहे. काही प्लॅन्स तर थेट बंदच करण्यात आले आहेत. कालच व्होडाफोन आयडियाचे कुमार मंगलम बिर्ला यांनी जर सरकारने आम्हाला काही सहकार्य केलं नाही तर व्होडाफोन आयडिया बंद पडू शकते असं सांगितलं आहे!
या सर्व गोष्टी घडताना किमान कॉलिंग तरी अमर्याद ठेऊन एयरटेल, व्होडाफोन, आयडिया ग्राहकांची नाराजी कमी नक्कीच झाली असेल. याशिवाय या ऑपरेटर्सच्या पोस्टपेड प्लॅन्सच्या किंमतीत जवळपास कोणताही बदल करण्यात आलेला नाही हे विशेष!
Search Terms Airtel Vodafone Idea Unlimited Voice Calling Plans with Internet Data Calling Limit Revoked While Jio will still charge its customers IUC