यूट्यूबने त्यांच्या स्वतः बनवलेल्या ‘यूट्यूब ओरिजिनल्स‘ या नावाने सादर केल्या जात असलेल्या वेब सिरीजमध्ये ‘एज ऑफ एआय’ चा समावेश केला आहे. या मालिकेसाठी त्यांनी आयर्न मन फेम रॉबर्ट डाउनी ज्युनियर ( Robert Downey Jr ) यांना सोबत घेतलं आहे. Age of A.I. मालिकेत कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल माहिती देणे आणि त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे असा उद्देश आहे. यूट्यूबतर्फे असं सांगण्यात आलं आहे हा मालिकेद्वारे सर्वात नावीन्यपूर्ण आणि आघाडीच्या तंत्रज्ञान यांची माहिती दिली जाईल जे आपलं कायमचं बदलून टाकणार आहेत!
या मालिकेचे पाहिले दोन भाग आता यूट्यूबवर उपलब्ध झाले असून प्रत्येक एपिसोड ४० मिनिट लांबीचा आहे. दर आठवड्याला एक अशा प्रकारे नवा एपिसोड सादर केला जाणार आहे. जर तुमच्याकडे यूट्यूब प्रीमियम असेल तर तुम्ही पूर्ण मालिका (म्हणजे पुढील येणाऱ्या भागांसह) आत्ता लगेच पाहू शकाल!

ही मालिका सर्वसामान्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता काय असते हे समजावं या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे याद्वारे तांत्रिक गोष्टी शिकायला मिळणार नाहीत हे लक्षात घ्यावं. कृत्रिम बुद्धिमत्तेची सध्याची अवस्था, चालू प्रक्रिया, याचा भविष्यावर असलेला परिणाम या गोष्टींवर या मालिकेचा जास्त भर असेल.
AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चा वापर आपल्या आजूबाजूला उपलब्ध गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत असून येणाऱ्या वर्षात AI आधारित नोकऱ्यांची गरज निर्माण होईल. त्यानुसार सध्या अभ्यास सुरू असलेल्या व्यक्तींनी तयारीला लागावं. फोन्स, व्हॉईस असिस्टंट, टीव्ही यामार्गे AI लवकरच आपल्या हातामध्ये, आपल्या घरामध्ये उपलब्ध होत आहे. सध्या AI मुळे कामे वेगाने होण्याच्या दृष्टीने पावले पडत असली तरी भविष्यात याचा वापर वाईट हेतूने केला जाऊ शकतो असं स्पष्ट मत अनेकांनी मांडलं आहे. त्या दृष्टीने या तंत्रज्ञानात काय काय घडामोडी घडत जातील ते २०२० मध्ये आपण पाहूच…