गूगलने काल दिलेल्या माहितीनुसार फिटनेस वियरेबल्स (घडयाळ, बॅंड) बनवणाऱ्या फिटबिट कंपनीचं २.१ बिलियन डॉलर्सना अधिग्रहण केलं आहे! यामुळे स्मार्टवॉचसारख्या उपकरणांसाठी असणाऱ्या wearOS वर आणखी काम करत गूगलला स्वतःची उपकरणे बाजारात उपलब्ध करून देता येतील अशी माहिती गूगलकडून देण्यात आली आहे. फिटबिट हे नाव फिटनेससाठी असलेल्या उपकरणात आघाडीला आहे. सोपा इंटरफेस आणि चांगल्या सुविधा यामुळे यांची स्मार्ट घड्याळेही लोकप्रिय झाली होती.
मात्र गूगलच्या या अधिग्रहणामुळे अनेक ग्राहकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे कारण आता त्यांच्या आरोग्यविषयीची माहिती गूगलकडे जाईल अशी त्यांना भीती आहे. आधीच बऱ्यापैकी सर्व माहिती असलेलं गूगल आता फिटनेस आणि हेल्थचा वापर कशा प्रकारे करेल ही नक्कीच चिंतेची बाब असेल. मात्र याबाबत फिटबिटने खास पोस्ट लिहून ग्राहकांच्या आरोग्य आणि फिटनेस डेटाच्या गोपनियतेची पुरेपूर काळजी घेतली जाईल आणि हा डेटा गूगलकडून जाहिरातींसाठी वापरला जाणार नाही असं सांगितलं आहे.
गूगलची wearOS आता वियरेबल्समध्ये बरीच मागे पडली आहे. अॅपलचं अॅपल वॉच सर्वत्र वापरलं जाऊ लागलं असून सॅमसंगसारख्या कंपन्या सुद्धा स्वतःची ओएस वापरत आहेत. आता पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यासाठी गूगलने फिटबिटच्या हार्डवेअरचा वापर करून काही नवं आणलं आणि त्याला चांगला प्रतिसाद लाभला तर आपल्याला लवकरच आणखी स्मार्ट उपकरणे पाहायला मिळतील.