काल फेसबुकने आणखी एक नवी सेवा सादर केली असून या नव्या सेवेचं नाव फेसबुक पे असं असणार आहे. या सेवेद्वारे यूजर्सना इतर यूजर्स किंवा बिझनेसेसना मेसेंजर, इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅप मार्फत पैसे देता येणार आहेत! ही सेवा तूर्तास अमेरिकेत सादर झालेली आहे.
यासाठी तुम्ही तुमचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड फेसबुक पेवर जोडायच आणि कोणत्या अॅप्सवर फेसबुक पेची सेवा वापरायची याची निवड करायची. सुरवातीला ही सेवा पैसे उभे करण्यासाठी, कार्यक्रमाची तिकीटे, गेममध्ये खरेदी, व्यक्तींमधील पैशाची देवाणघेवाण आणि फेसबुक मार्केटप्लेसवरील काही ठिकाणी वापरता येईल.
सुरक्षेसाठीही फेसबुकने विशेष काळजी घेत असल्याची माहिती दिली आहे. पिन, टच आयडी, फेस आयडी द्वारे अधिक सुरक्षा उपलब्ध करून दिली जाईल. ग्राहकांची बायोमेट्रिक माहिती फेसबुकला मिळणार नाही आणि फेसबुक यापैकी कोणती माहिती साठवणार नाही असं सांगण्यात आलं आहे. अर्थात यावर किती विश्वास ठेवायचा हा वेगळा प्रश्न…
https://www.facebook.com/facebookapp/videos/403080913901331
फेसबुकने इंस्टाग्राम व व्हॉट्सअॅपवर ही सेवा काही कालावधीत उपलब्ध करून दिली जाईल असं सांगितलं आहे. भारतामध्ये फेसबुक व्हॉट्सअॅपची गेली अनेक महीने चाचणी करत आहे. जुलै महिन्यात २०१९ च्या शेवटी ही सेवा उपलब्ध केली जाईल असं सांगण्यात आलं होतं मात्र आरबीआयने सुप्रीम कोर्टमध्ये अशी माहिती दिली आहे की फेसबुकने अद्याप त्यांचा डेटा भारतात साठवण्यास सुरुवात केली नाही. काही महिन्यांपूर्वीच ही गोष्ट अनेक कंपन्याना सांगण्यात आली असून डेटा सेंटर्स भारतात सुरू करण्याचे (Data Localization) आदेश देण्यात आले आहेत. यामुळेच व्हॉट्सअॅप पे अद्याप सर्वांना उपलब्ध झालेलं नाही.
याशिवाय काही महिन्यांपूर्वी जाहीर झालेल्या त्यांच्या लिब्रा या आभासी चलनालाही (क्रिप्टोकरन्सी) बराच विरोध होत असून काही मोठ्या कंपन्या लिब्रा असोसिएशनमधून बाहेर पडत आहेत.
प्रायव्हसी आणि सुरक्षिततेवरून फेसबुकला रोज ओरडा पडत असतानाच काल आलेल्या माहितीनुसार फेसबुक iOS अॅपमधील बगमुळे फेसबुकची फिड तपासत असताना युजरला न सांगता कॅमेरा सुरू राहत आहे! फेसबुक युजर्सच्या प्रायव्हसीची काळजी घेण्याबाबत कधी गंभीर होणार हा प्रश्न अलीकडे वारंवार विचारला जात आहे…