मायक्रोसॉफ्ट संस्थापक बिल गेट्स यांनी जगातल्या सर्वात श्रीमंत स्थानी पुन्हा एकदा स्थान मिळवलं आहे. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोसना मागे टाकत त्यांनी अनेक वर्षं भूषवलेला हा बहुमान परत मिळवला आहे. गेली दोन वर्षे ते ह्या स्थानी येऊ शकले नव्हते. काही दिवसांपूर्वीच जाहीर झालेल्या मायक्रोसॉफ्टच्या पेंटागॉनसोबतच्या भागीदारीमुळे बिल गेट्स यांच्या संपत्तीत पुन्हा वाढ झाली आहे. हा करार तब्बल 10 बिलियन डॉलर्सचा (जवळपास ७२००० कोटी रुपये) आहे. हाच करार अॅमेझॉनसोबत न झाल्यामुळे त्यांचे शेयर्स घसरून जेफ बेझोस यांची संपत्ती कमी झाली आहे. यामुळे काही फरकाने का होईना बिल गेट्स पुन्हा एकदा सर्वात श्रीमंतपदी पुन्हा विराजमान झाले आहेत.
सलग २४ वर्षे सर्वात श्रीमंत असलेल्या बिल गेट्स यांना जेफ बेझोसनी काही महिन्यांपूर्वीच मागे टाकलं होतं. त्यावेळी जेफ बेझोस यांची संपत्ती बिल गेट्स यांच्या तुलनेत बरीच वाढली होती. मात्र मध्यंतरी जेफ बेझोस यांचा त्यांच्या पत्नीसोबत (मॅकेन्झी बेझोस) घटस्फोट झाल्याने अॅमेझॉनमधील त्यांचा बराच हिस्सा त्यांच्या पत्नीच्या नावे केला गेला आहे. त्यामुळे आधी इथे संपत्ती कमी झाली आणि नंतर काही प्रमाणात अॅमेझॉनद्वारे अपेक्षेपेक्षा कमी झालेला फायदा कारणीभूत ठरले आहेत.गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या काळात ४८ टक्के कमी फायदा पाहायला मिळाला आहे.
दरम्यान मायक्रोसॉफ्टचे शेयर्स यावर्षी ४८ टक्क्यानी वधारले आहेत! यामुळे बिल गेट्सना जेफ बेझोसना मागे टाकणं सोपं गेलं. मात्र बिल गेट्स सध्या मायक्रोसॉफ्टमध्ये कोणत्याही पदावर काम करत नसून ते त्यांचा वेळ प्रामुख्याने सामाजिक कार्यात देत आहे. आत्ता जेफ बेझोस यांची संपत्ती 108.7 बिलियन डॉलर्स असून बिल गेट्स यांची 110 बिलियन डॉलर्स एव्हढी आहे. पेंटागॉनच्या करारासंबंधी बातमी आल्यापासून मायक्रोसॉफ्टचे शेयर्स ४ टक्क्यानी वाढले आहेत तर अॅमेझॉनचे २ टक्क्यानी घसरले आहेत!
बाकी या यादीत फेसबुक संस्थापक मार्क झकरबर्ग पाचव्या स्थानी तर गूगलचे संस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी आहेत. भारतातून मुकेश अंबानी यांनी या यादीत वर स्थान मिळवलं असून आता ते चौदाव्या क्रमांकावर आहेत.