फेसबुकने शुक्रवारपासून फेसबुकवर केल्या गेलेल्या पोस्ट्सवरील लाईक्स, व्ह्युज, रिअॅक्शन्स दाखवणार नाही अशी माहिती दिली आहे. याची चाचणी शुक्रवारपासून ऑस्ट्रेलियामध्ये सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता फक्त पोस्ट करणाऱ्या व्यक्तीलाच त्या पोस्टवर किती लोकांनी लाईक्स, रिअॅक्शन्स दिल्या आहेत ते समजेल. काही कालावधीत फेसबुकवरील हा बदल सर्वच देशांमध्ये पाहायला मिळेल.
फेसबुकतर्फे याबाबत माहिती देताना असं सांगण्यात आलं आहे की त्यांनी याची मर्यादित स्वरूपात चाचणी सुरू केली असून Likes, Reactions, Video Views आता मूळ पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीखेरीज इतर कोणालाही दिसणार नाहीत. या बदलामुळे यूजर्सच्या फेसबुक वापर करण्याच्या अनुभवात काही सुधारणा होत आहे का याचा अभ्यास करत आहोत.
याच महिन्याच्या सुरुवातीला फेसबुकने या प्रयोगाची सुरुवात केली होती. हा बदल इंस्टाग्रामवर देखील करण्यात येत असून इंस्टाग्रामवर केलेल्या या प्रयोगामुळे यूजर्सचं अधिकाधिक लाईक्स मिळवण्याचं दडपण कमी झाल्याच निदर्शनास आलं आहे असं फेसबुकने सांगितलंय! जुलै महिन्यातच ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, न्यूझीलंड, आयर्लंड, इटली आणि जपान या देशांमध्ये इंस्टाग्रामवर लाईक्सची संख्या दाखवली जात नाही!
आता फेसबुक, इंस्टाग्रामवरील पोस्ट्सवर लाईक्स, रिअॅक्शन्स, व्ह्युज दिसणार नाहीत हे सांगितलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. गेली कित्येक वर्षं अनेकांनी या लाईक्स अन व्ह्युजच्या खेळात गैरप्रकार सुद्धा केलेले आहेत. अनेक पेजेस यामुळे चर्चेत आली आहेत. कुणालाही फायदा नसलेली स्पर्धा यामुळे पुढे येत गेली अन ह्याचा त्रास यूजर्सना होऊ लागला. अमुक आवडत असेल तर लाइक नाही कमेंट, हा आवडत असेल तर ही रिअॅक्शन द्या नसेल तर ती अशा पोस्ट्सचा भडिमार होत आहे. जर एकंदर सोशल मीडिया वापरण्याचा अनुभव अशा प्रकारे त्रासदायक होऊ लागला तर ते आपल्याला महागात पडेल हे जाणून फेसबुकने हा बदल करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच यूट्यूबने सुद्धा सबस्क्रायबर्सची संख्या वेगळ्या प्रकारे दाखवण्यास सुरुवात केली आहे. आता अशा बदलांमुळे अनेकांची सोशल मीडिया दुकाने बंद होऊ लागतील हे वेगळं सांगायला नको…!