अँड्रॉइडची नवी ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइड १० कालपासून अनेक फोन्सवर उपलब्ध झाली आहे. अर्थात सर्वात आधी गूगलच्या स्वतःच्या पिक्सल फोन्सवर हे अपडेट देण्यात आलं असून त्यामध्ये Pixel, Pixel XL, Pixel 2, Pixel 2 XL, Pixel 3, Pixel 3 XL, Pixel 3a आणि Pixel 3a XL अशा सर्व फोन्सचा समावेश आहे! बाकी कंपन्यांमध्ये Redmi K20 Pro, OnePlus 7 व OnePlus 7 Pro, Essential Phone यांनी हे अपडेट अगदी पहिल्याच दिवशी दिलं आहे. रेडमी आणि वनप्लसनी चाचणी आवृत्ती दिली असून आता नव्याने फोन सादर करत नसलेल्या एसेंशियल कंपनीने मात्र स्टेबल आवृत्ती दिली आहे!
काही दिवसांपूर्वीच गूगलने माहिती दिल्याप्रमाणे अँड्रॉइड Q चं नवं नाव अँड्रॉइड १० असणार आहे. यापुढे अँड्रॉइडच्या आवृत्त्यांची नवे डेझर्टसवरून नसणार. त्यावेळी अँड्रॉइडसाठी नवा लोगोसुद्धा सादर करण्यात आला होता!
अँड्रॉइड १० बद्दल माहिती देण्यासाठी गूगलतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या ब्लॉगपोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की अँड्रॉइड आता 5G फोन्सना सपोर्ट देत असून प्रथम LG V50 5G ThinQ, Samsung Galaxy S10 5G, Xiaomi Mi Mix 5G आणि OnePlus 7 Pro 5G यांना हा सपोर्ट मिळत आहे. यासोबत घडी घालता येणाऱ्या फोन्सना सुद्धा अँड्रॉइड १० सपोर्ट देत आहे. अँड्रॉइड १० ओएस अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि तुमच्या डेटावर अधिक नियंत्रण देणारी असेल.
अँड्रॉइड १० मध्ये नव्याने जोडण्यात आलेल्या सुविधा
- Foldables सपोर्ट : घडी घालता येणाऱ्या सॅमसंग गॅलक्सी फोल्ड सारख्या फोन्सना आता अधिकृत सपोर्ट मिळणार असून यामुळे हे फोन्स वापरणं आणखी सोपं होईल. येत्या काळात या प्रकारच्या फोन्सचं वाढणारं प्रमाण लक्षात घेऊन गूगलने हा बदल केला आहे. यामुळे फोन घडी घातलेल्या अवस्थेत करत असलेली गोष्ट घडी उलगडल्यावरसुद्धा मोठ्या स्क्रीनवर आपोआप अॅडजस्ट होईल!
- 5G Networks : लवकरच सर्वत्र सुरू होत असलेल्या 5G तंत्रज्ञानाला अँड्रॉइड १० सपोर्ट देत असून यामुळे अनेक पटींनी वाढलेल्या इंटरनेट स्पीडचा आनंद अॅप्स व गेम्सवर सहज घेता येईल!
- Live Caption : या सुविधेमुळे फोनमध्ये कुठेही ऑडिओ/व्हिडिओ सुरू असताना त्याच्या कॅप्शन्स पाहता येतील! https://youtu.be/YL-8Xfx6S5o
- Smart Reply in notifications : नोटिफिकेशन्समध्ये स्मार्ट रिप्लायची सोय जी मशीन लर्निंगचा वापर करून नोटिफिकेशनला अपेक्षित रिप्लाय स्वतःहून सुचवेल!
- Dark Theme : अँड्रॉइड १० मध्ये प्रथमच डार्क मोड थीमचा पूर्ण फोनमध्ये वापर करता येणार असून यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होईल आणि बॅटरीसुद्धा वाचेल!
- Gesture navigation : यामुळे नॅविगेशन बार गायब होणार असून केवळ जेश्चर (वेगवेगळे स्वाईप) आधारित नॅविगेशन वापराव लागेल.
- प्रायव्हसी : अलीकडे डेटा प्रायव्हसीवरून सुरू असलेल्या चर्चेला पर्याय म्हणून गूगलने अँड्रॉइड १० मध्ये बरेच नवे पर्याय जोडले आहेत जे आपल्याला डेटावर नियत्रण मिळवून देतील. यामध्ये प्रमुख पाऊल म्हणजे कोणत्या अॅपला कोणती परवानगी द्यायची याचं नियंत्रण. शिवाय लोकेशन, डिव्हाईस ट्रॅकिंगसाठीसुद्धा नवे पर्याय!
- Digital Wellbeing वर सुद्धा आणखी जास्त लक्ष देण्यात आलं असून फोकस मोडद्वारे आपल्याला फोन वापरण्यामधून विश्रांती घेण्यास, कोणत्या अॅपवर किती वेळ घालवला हे पाहण्यास मदत होईल.