भारतात सध्या टीव्ही क्षेत्रासोबत जोरात वाढत असलेल्या ऑनलाइन स्ट्रिमिंग सेवांच्या मागणीकडे आता एयरटेल नव्या पर्यायाद्वारे लक्ष देणार असून यासाठी एक्सस्ट्रिम (Xstrean) नावाचा डिजिटल एंटरटेंमेंट प्लॅटफॉर्म सादर केला आहे. यामध्ये तीन प्रकारच्या सेवा मिळणार असून पहिली सेवा एयरटेलच्या Xstream अॅपद्वारे दिली जाईल जे अॅप एयरटेल टीव्ही या जुन्या अॅपची जागा घेणार आहे. हे नवं अॅप एयरटेल ग्राहकांसाठी उपलब्ध झालेलं आहे. यामध्ये आता नवा इंटरफेस असेल आणि त्यासोबत ४०० लाईव्ह टीव्ही चॅनल्स, १०००० चित्रपट आणि मालिका ज्या Netflix, Amazon Prime, ZEE5, HOOQ, Hoi Choi, Eros Now, HungamaPlay, ShemarooMe, Ultra and Curiosity Stream इ. स्ट्रिमिंग सेवांसोबत भागीदारीत जोडलेल्या आहेत.
अॅपसोबत आता त्यांनी Xstream Stick आणि Xstream Box सादर केला आहे. Airtel Xstream Android Stick ही एक अँड्रॉइड आधारित ओव्हर द टॉप (OTT) टीव्ही स्टिक असून ही कोणत्याही एचडी टीव्हीला जोडून आपण त्यावर एयरटेल Xstream वर उपलब्ध मालिका, टीव्ही, चित्रपट पाहू शकतो. सोबत Airtel Wync सेवेमधील गाणी सुद्धा ऐकू शकतो. ही स्टिक थोडक्यात क्रोमकास्ट किंवा फायर टीव्ही स्टिक प्रमाणे काम करते. या स्टिकची किंमत ₹३९९९ आहे.
Airtel Thanks Platinum आणि Gold ग्राहकांना या सर्व सेवा मोफत पाहता येतील. (त्यासाठी तुम्ही तुमच्या एयरटेल सिमवर अनलिमिटेड पॅकने रीचार्ज करावा लागेल). जे एयरटेल ग्राहक नाहीत त्यांना ३० दिवस मोफत त्यानंतर वर्षाला ₹९९९ द्यावे लागतील.
Airtel Xstream Web : https://www.airtelxstream.in
एक्सस्ट्रिम स्टिकसोबत सादर झालेला Xstream Box हा अँड्रॉइड टीव्ही बॉक्स असून यामध्ये आणखी सुविधा मिळतील. Netflix, Amazon Prime Video, ZEE5, HOOQ, SunNXT यांचा कंटेंटसाठी शॉर्टकट्स दिलेले आहेत. या टीव्ही बॉक्सची सुद्धा किंमत ₹३९९९ असणार आहे. यामध्ये एक व्हॉईस कंट्रोल करता येणारा रिमोट मिळेल. या बॉक्ससोबत ५०० टीव्ही चॅनल्स मिळतील व सोबत वर सांगितलेली OTT लायब्ररीसुद्धा मिळेलच.. या बॉक्ससोबत एक वर्ष Xstream अॅपमधील सर्व कंटेंट मोफत पाहता येईल आणि त्यावर एक महिना HD DTH पॅकसुद्धा मिळेल! सध्याच्या एयरटेल डिजिटल टीव्ही ग्राहक ₹२२४९ देऊन या बॉक्सला अपग्रेड करू शकतात.
ही दोन्ही उपकरणे एयरटेल स्टोर्स, क्रोमा विजय सेल्ससोबत फ्लिपकार्ट व अॅमेझॉनवर उपलब्ध असतील. ह्या अशा प्रकारच्या स्टिक अलीकडेच टाटा स्काय आणि D2h ने सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत. वाढत्या स्पर्धेमुळे सर्वच कंपन्यांना ग्राहक टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. आता काही दिवसातच येणाऱ्या जिओ ब्रॉडब्रॅंड, जिओ डीटीएच सेवांचा धसका या कंपन्यानी घेतलेला दिसतोय. जिओच्या या सेवा ५ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहेत.