जिओ फायबर सेवा काल रिलायन्स AGM (वार्षिक सर्वसाधारण सभा) मध्ये जाहीर झाली असून ही सेवा आता ५ सप्टेंबरपासून सर्वांसाठी उपलब्ध होईल. यावेळी श्री मुकेश अंबानी यांच्यातर्फे अशीही माहिती जाहीर करण्यात आली आहे की जिओ सध्या भारतातली सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे.
जिओ फायबर ही एक FTTH (फायबर टू द होम) सेवा असून घरगुती ब्रॉडब्रॅंडसाठी ही उपलब्ध होणार आहे. याची चाचणी जवळपास वर्षभर सुरू असून आता ५ सप्टेंबरपासून सर्व यूजर्ससाठी ही उपलब्ध होईल.
जिओ फायबर होम ब्रॉडब्रॅंड किंमती आणि सुविधा
Jio Fiber द्वारे ग्राहकांना तब्बल 1Gbps पर्यंत इंटरनेट स्पीड मिळेल. बेस प्लॅन 100Mbps पासून सुरू होत असून यांच्या किंमती दरमहा ७०० रुपयांपासून सुरू होऊन १०००० रुपये पर्यंत अशा आहेत. Jio Fiber Welcome Offer मार्फत जे ग्राहक जिओ फायबरचा वार्षिक प्लॅन निवडतील त्यांना एचडी/4K टीव्ही आणि Jio 4K Set Top Box चक्क मोफत मिळेल.
जिओ फायबरसोबत अनेक ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म जसे की इरोस नाऊ, व्हूट, अल्ट बालाजी उपलब्ध होणार आहेत. जिओच्या सेट टॉप बॉक्सवर अनेकांना सोबत गहजेउण जिओ व्हिडिओ कॉन्फ्रेंस कॉलसुद्धा करता येईल
जिओ एक प्रीमियम मेंबरशिप सुद्धा आणत असून ज्याद्वारे ग्राहक एखादा चित्रपट ज्यादिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल त्याच दिवशी घरी पाहता येण्याची सोय देणार आहेत! ही सेवा २०२० च्या मध्यात सुरू होईल.
जिओच्या ब्रॉडब्रॅंडसोबत अमर्याद कॉलिंग सेवा दिली जाणार आहे. ती सुद्धा मोफतच! Jio Fiber Landline द्वारे ही सेवा पुरवली जाईल. 4K सेट टॉप बॉक्सद्वारे DTH क्षेत्रातसुद्धा जिओ आता प्रवेश करत असून यामुळे नव्या प्रकारचा अनुभव मिळेल अशी आशा त्यांच्यातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
या सेट टॉप बॉक्सद्वारेच गेमिंग कॉन्सोल प्रमाणे गेमिंगसुद्धा करता येणार आहे. यासाठी त्यांनी मायक्रोसॉफ्ट स्टुडिओ, टेनसेंट गेमिंग, राएट गेम्स, गेमलॉफ्ट, इ सोबत भागीदारी केली आहे. सोबत जिओ मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट Jio Holoboard सुद्धा आणत असून याद्वारे शॉपिंग, शिक्षण, मनोरंजन यासाठी आभासी जगात फिरत कपडे घालून पाहणे, सौरमंडलाचा घरबसल्या अभ्यास करणे अशा गोष्टी करता येतील. जिओने मायक्रोसॉफ्टसोबत क्लाऊड सेवांबाबतही करार केला असून यामुळे मायक्रोसॉफ्ट अझुर क्लाऊड सेवा भारतात स्वस्त व सहज उपलब्ध होतील.