गूगल फोटोज् या गूगलच्या फोटो अॅपमध्ये ऑप्टिकल कॅरक्टर रिकग्निनिशन (OCR) चा वापर करून फोटोमध्ये असलेला टेक्स्ट/मजकूर ओळखून त्याद्वारे सर्च केल्यास तो फोटो शोधून देईल. समजा तुम्ही एखादा फोटो काढला आहे ज्यामध्ये कुठेतरी ‘Marathi’ असं लिहिलं आहे तर आता तुम्ही गूगल फोटोजमध्ये जाऊन Marathi असं सर्च केलं तर तो फोटो दाखवेल! यामुळे फोटो पटकन शोधणं आणखी सोपं होणार आहे!
गूगल फोटोजमध्ये सध्या अनेक सोयी जोडलेल्या असून प्रत्येक नवीन अपडेटसोबत आपलं काम आणखी सोपं करणाऱ्या सुविधा यामध्ये पहायला मिळत आहेत. आता तर फोटोमध्ये असलेल्या गोष्टी ओळखून सर्च करण्याची सोय दिली जात आहे! ही सुविधा सध्या रोल आउट केली जात असून त्यामुळे गूगल फोटोज अॅप अपडेट केल्यावर पाहता येईल तर काहींना आणखी वाट पहावी लागेल.
ही सोय वापरण्यासाठी Google Photos अॅप उघडा. तुम्हाला ज्या फोटो/इमेज/स्क्रीनशॉटमधील टेक्स्ट आठवत आहे आणि तो सर्च करायचा आहे त्यामधील टेक्स्ट सर्च करा आणि गूगल लगेच तो फोटो समोर आणून दाखवेल. ही सोय विविध भाषांमध्ये चालत आहे. अलीकडेच सादर झालेल्या सॅमसंग गॅलक्सी नोट १० + मध्ये सुद्धा ही सोय हाताने लिहलेल्या नोट्स बाबत पहायला मिळत आहे. मात्र गूगल फोटोज त्याप्रकरच्या हाताने लिहलेल्या नोट्स ओळखेल का हे अद्याप अस्पष्ट आहे.
तसेच तुम्हाला सर्च करून दिलेल्या फोटोवर जर तुम्ही गूगल लेन्सचा वापर केला तर तो टेक्स्ट सिलेक्ट होईल आणि मग तुम्ही तो कॉपी पेस्टसुद्धा करू शकाल!