भारतात स्ट्रिमिंग सेवांमध्ये अलीकडे फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. आता यामध्ये ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी फ्लिपकार्टनेही प्रवेश केला आहे. त्यांच्या सेवेचं नाव Flipkart Videos असं असेल. त्यांच्या अँड्रॉईड अॅपमध्ये कालपासून ही सेवा उपलब्ध झालेली पहायला मिळत आहे. यामुळे नेहमीच्या शॉपिंग क्षेत्राबरोबर आता फ्लिपकार्टची स्पर्धा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओसोबतही होईल!
फ्लिपकार्ट व्हिडिओज् सेवा फ्लिपकार्ट शॉपिंग अॅपमध्येच उपलब्ध करून देण्यात आली असून व्हर्जन 6.17 मध्ये अपडेट करून या सेवेचा आनंद घेता येईल. यासाठी खाली असलेल्या मेन्यूमध्ये तुम्हाला आता दोन नवे पर्याय पहायला मिळतील. Ideas आणि Videos. Ideas पर्यायाद्वारे खरेदीसाठी फ्लिपकार्टद्वारे वेगवेगळ्या प्रकारे उत्पादने सुचवून मदत करेल. Videos पर्यायामध्ये चित्रपट आणि टीव्ही मालिका पाहता येतील! Arre, डाइस मीडिया, टीव्हीएफ आणि व्हूट यांचे व्हिडिओसुद्धा पाहता येतील! फ्लिपकार्ट तर्फे मिळालेल्या माहितीनुसार ते स्वतःचे चित्रपट किंवा मालिका सध्या बनवणार नसून जर या सेवेला अधिक प्रतिसाद मिळत गेला तर मात्र याबाबत विचार करू असं सांगण्यात आलं आहे. सध्यातरी हिंदी वा इंग्लिश भाषांमधीलच व्हिडिओ दिसत आहेत. इतर कोणत्याच भाषेतील व्हिडिओ/चित्रपट यांचा समावेश दिसत नाहीये. एकूण कंटेंटसुद्धा फारच कमी आहे.
फ्लिपकार्ट व्हिडिओज् फ्लिपकार्टवर रजिस्टर केलेल्या सर्वांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. अर्थात केवळ मोफत अशाप्रकारे व्हिडिओज् दाखवण्यात येणार असल्यामुळे या व्हिडिओसोबत जाहिराती पहायला मिळतील. सध्यातरी ही सेवा अँड्रॉइडवरच असून लवकरच iOS वरही उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टचे शॉपिंग संबंधित पर्याय सोडून इतर सेवा देण्याचे यापूर्वीचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीयेत. आता या व्हिडिओजमध्येतरी त्यांना यश मिळेल का हे पाहावं लागेल..!