DJI या प्रसिद्ध ड्रोन निर्मिती करणाऱ्या कंपनीने आता गिंबल्सवर लक्ष केंद्रित करत नवा स्मार्टफोन गिंबल सादर केला आहे. ऑस्मो मोबाइल ३ हँडहेल्ड स्मार्टफोन स्टॅबिलायझरमध्ये अनेक नव्या सोयी जोडण्यात आल्या आहेत ज्यामध्ये प्रमुख म्हणता येईल ती म्हणजे याची घडी घालता येते. ज्यामुळे हा आता आणखी कमी जागा घेतो. याची किंमत $119 (~₹८५००) इतकी असून कॉम्बो पॅकमध्ये ट्रायपॉड आणि कॅरिंग केस मिळेल ज्याची एकत्र किंमत $139 (~₹१००००) अशी असेल.
Osmo Mobile 3 आता आणखी लहान व हाताळण्यास सोपा असणार आहे. पूर्वीच्या व्हर्जन्स मध्ये फोनचं रोटेशन बदलण्यासाठी फोन काढावा लागत होता आता मात्र मोड बटन तीन वेळा दाबल्यास गिंबल लँडस्केप/पोर्ट्रेट मोडमध्ये आपोआप बदल करेल!
डीजेआयची ओळख असलेल्या ड्रोन व्यवसायासोबत आता ते दुसऱ्या उत्पादनांकडेही तेव्हढंच लक्ष केंद्रित करत असल्याच दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच आलेला DJI Ronin SC हा खास मिररलेस कॅमेरासाठी तयार केलेला गिंबल सादर झाला होता. जो कुठेही नेता येईल आणि किमतीतही कमी असा पर्याय आहे! ऑस्मो अॅक्शन या अॅक्शन कॅमेराद्वारे गोप्रोच्या कॅमेरासोबत थेट स्पर्धा सुरू केली आहे. रोबोमास्टर एस१ हा शैक्षणिक रोबोटसुद्धा नुकताच सादर करण्यात आला आहे.