मायक्रोसॉफ्टने काही दिवसांपूर्वी RAW Image Extension उपलब्ध करून दिलं असून याद्वारे विंडोज् १० मध्ये कोणत्याही अतिरिक्त सॉफ्टवेअरशिवाय रॉ इमेजेस फोटोज/गॅलरी अॅपमध्ये पाहता येतील! यापूर्वी विविध कॅमेरा कंपनीसाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर घ्यावे लागायचे किंवा अडोबीच्या टूल्सवर अवलंबून राहावं लागायचं. विंडोज १० मध्ये असलेल्या फोटोज अॅपमध्ये नेहमीच्या JPG, PNG फाइल्स प्रमाणे आता कॅननच्या crw, सोनीच्या arw, निकॉनच्या nef, अडोबीच्या dng फाइल्ससुद्धा सहज पाहता येतील!
हे एक्सटेन्शन वापरण्यासाठी आधी तुम्ही Windows 10 May 2019 अपडेट इंस्टॉल केलं असल्याची खात्री करा. त्यानंतर RAW Image Extension या लिंकवर जा आणि ते अॅप डाउनलोड करा. (किंवा तुम्ही मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर जाऊन RAW Image Extension असं सर्च करू शकता.) यानंतर सर्व कोडेक्स इंस्टॉल होऊन तुम्हाला आता एक्सप्लोरर मध्ये सुद्धा रॉ इमेजेसचे प्रीव्यू दिसू लागतील. कुठल्याही RAW फोटोवर Right Click करा आणि Open With निवडून Photos वर क्लिक करा. इथून पुढे तुम्ही फोटोजमध्ये कोणत्याही कंपनीच्या रॉ फाइल्स उघडून पाहू शकाल.
RAW Format Images म्हणजे काय ?
RAW इमेज म्हणजे अशी इमेज जिच्यावर डिजिटल कॅमेराद्वारे फोटो काढल्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. (शब्दशः अर्थ कच्च्या स्वरूपात) थेट सेन्सरद्वारे टिपलेला फोटो आहे असा त्या त्या कंपनीच्या खास raw फॉरमॅट मध्ये मेमरी कार्डवर साठवला जातो.
कोणत्याही कॅमेरामध्ये फोटो काढायला गेलात तर सुरुवातीला कॅमेरा ते फोटो JPG/PNG या फॉरमॅटमध्येच साठवत असतो. मात्र हे JPG/PNG फोटो कॅमेराद्वारे प्रक्रिया करून त्यामध्ये डेटा जोडून साठवलेले असतात. यांच्या डेटावर त्यानंतर फारसं नियंत्रण नसतं. मात्र जर रॉ फॉरमॅटमध्ये फोटो काढला तर त्या फोटोवर फोटो काढल्यानंतरसुद्धा आपल्याकडे पूर्ण नियंत्रण असतं. उदा. रंग, उजेड, सावल्या, प्रकाश अशा प्रत्येक गोष्टीवर आपण लाईटरूम सारखे सॉफ्टवेअर वापरून हव्या त्या प्रकारे इमेज डेव्हलप करू शकतो.
रॉ इमेजेस पाहण्यासाठी आता विंडोजने पर्याय दिलेला असला तरी आजवर Adobe Photoshop Lightroom, Capture One, Corel AfterShot Pro, Raw Studio, RawTherapee, darktable, इ. सॉफ्टवेअर्सचा वापर फोटो पाहण्यासाठी करायला लागायचा. आता हे सॉफ्टवेअर फोटो डेव्हलप करतानाच उपयोगी पडतील. आता तर कॅमेरासोबत फोन्समध्येही रॉ फॉरमॅटमध्ये फोटो काढता व पाहता येतात! फोनवर रॉ फोटो प्रोसेस करण्यासाठी Snapseed अॅप उत्तम पर्याय आहे.
RAW फॉरमॅटमध्ये फोटो काढण्याचे फायदे
- रंगांच्या अधिक छटा वापरायला येतात. JPEG मध्ये आपण 8bit रंग वापरतो तर RAW मध्ये 12/14 Bits
- फोटोची अधिक चांगली गुणवत्ता
- कॅमेराकडून गरज नसताना केलं जाणारं sharpening आणि noise reduction थांबवता येतं
- फोटोवर अधिक चांगलं नियंत्रण lightness, white balance, hue, saturation अशा गोष्टी प्रोसेस करता येतात
- इतर अनेक गोष्टी ज्यामुळे आपल्याला मूळ फोटोला नुकसान न करता हवे तसे बदल करून हव्या त्या स्वरूपाचं आउटपुट घेता येतं.
RAW फॉरमॅटमध्ये फोटो काढण्याचे तोटे
- RAW फॉरमॅटमध्ये फोटो काढताना फोटोची साईज JPEG च्या मानाने जास्त असते. एकेका फोटोलाच जवळपास २ ते ६ पट अधिक जागा लागू शकते.
- रॉ फॉरमॅटमध्ये प्रत्येक कंपनीने स्वतःच फाइल एक्सटेन्शन तयार केलं आहे त्यामुळे एक स्टँडर्ड नाहीये.
- स्टँडर्ड फाइल फॉरमॅट नसल्यामुळे प्रत्येक एक्सटेन्शनसाठी सॉफ्टवेअर सपोर्ट वेगवेगळा द्यावा लागतो.
- रॉ फोटो काढून ते प्रोसेस करून प्रत्यक्षात वापरण्यास बरंच जास्त वेळ जातो. JPEG फॉरमॅटमधील फोटो मात्र लगेच वापरण्यास तयार असतात.
search terms : what is raw photo image format in marathi pros and cons of raw Viewing Camera RAW Files Raw JPEG Difference